आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबावरही कर्जाचा डोंगर
By Admin | Updated: December 30, 2014 23:26 IST2014-12-30T23:26:14+5:302014-12-30T23:26:14+5:30
धारणी तालुक्यातील उकुपाटी या गावातील २००७ वर्षात आत्महत्या करणाऱ्या कर्जबाजारी शेतकऱ्याच्या विधवेवरही बँकेसह खासगी सावकारांचे कर्ज असतानाही खचून न जाता आपल्या मुला-मुलींचे लग्न

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबावरही कर्जाचा डोंगर
श्यामकांत पाण्डेय -धारणी
धारणी तालुक्यातील उकुपाटी या गावातील २००७ वर्षात आत्महत्या करणाऱ्या कर्जबाजारी शेतकऱ्याच्या विधवेवरही बँकेसह खासगी सावकारांचे कर्ज असतानाही खचून न जाता आपल्या मुला-मुलींचे लग्न करून शिक्षण पूर्ण करण्याच्या कामाचा निर्धार घेणाऱ्या कम्मोचे जीवन इतर कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी आदर्श घेण्यासारखे आहे.
धारणीपासून सात किलोमीटर अंतरावर उकुपाटी येथील कम्मोच्या जीवनाची संघर्षगाथा अत्यंत वेदनादायक आहे. २० डिसेंबर २००७ रोजी फगनू विष्णू धुर्वे (४०) याने बँकेतील कर्ज व खासगी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीच्या चिंतेने कंटाळून चेथर जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्यांचेवर बँकेचे १० हजार व खासगी सावकाराचे आठ हजार रुपयांचे कर्ज होते. परंतु १५ एकर कोरडवाहू निकस शेतातून अल्प उत्पन्नावर हे कर्ज कसे फेडता येईल या चिंतेने तो व्यथित होता. त्यामुळे तो एक दिवस घर सोडून निघून गेला व वन विभागाच्या कर्मचाऱ्याने त्याचे मृतदेह जंगलात मिळाल्याचे सांगितले.
फगनुला आई, पत्नी, दोन मुले व तीन मुली अशा मोठ्या परिवाराची चिंता होती. शेतात उत्पन्न होत नसल्यामुळे कर्जाची परतफेड करणे शक्य नव्हते. यामुळे तो नेहमी वेडसरसारखा वागायचा अशी माहिती देताना त्याची आई मंगलीचे डोळे पाणावले. एकमेव मुलाच्या जाण्याची वेदना सात वर्षानंतरही तिच्या डोळ्यातून जाणवत होती. घरात ती आपल्या नातवंडासह राखण करीत होती. तर फगनूची पत्नी कम्मो गावापासून एक किलोमीटर अंतरावरील शेतात तुरळक पिकाची राखन करीत होती. तिला घडलेल्या घटनेबाबत विचारताच तिने अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.
पतीच्या निधनानंतर तिने सावकारांकडून कर्ज घेऊन दोन मुले व एका मुलीचा विवाह लावला. लहान मुलगी इयत्ता दहावीत शिक्षण घेत असून मोठी मुलगी सातवी उत्तीर्ण झाल्यावर आईच्या मदतीसाठी अमरावती येथे मजुरीला गेल्याचे सांगितले. मोठा मुलगा आठवीत शिकून आईला हातभार लाण्यासाठी इलेक्ट्रीकचे काम करून मजुरी करतो. तर लहान मुलगा पहिलीत शिकूण शिक्षण सोडून मजुरी कामावर आईला शेती कामात मदत करीत आहे.