आमदारांनी जाणल्या समस्या

By Admin | Updated: October 5, 2016 00:23 IST2016-10-05T00:23:58+5:302016-10-05T00:23:58+5:30

येथे आ. वीरेंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती, तालुका जलयुक्त शिवार योजना आढावा, ..

Legislators know the problem | आमदारांनी जाणल्या समस्या

आमदारांनी जाणल्या समस्या

अधिकाऱ्यांना सूचना : नांदगावात समन्वय समितीची सभा
नांदगाव खंडेश्वर : येथे आ. वीरेंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती, तालुका जलयुक्त शिवार योजना आढावा, तालुका तक्रार निवारण समितीची सभा सोमवारी घेण्यात आली. यात जगताप यांनी गावागावांतील जनसमस्या जाणून घेतल्या. त्यांचा निपटारा होण्याच्या अनुषंगाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यावेळी इंदिरा आवास, पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांच्या यादीतून सुटलेली गावे, नांदगाव पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणेला विद्युत पुरवठ्याची समस्या, सुकळी येथील खचलेल्या विहिरींचे अनुदान, कृषी पंपाचा वीजपुरवठा, अडगाव बु. येथील खचलेल्या विहिरीचे १२ महिन्यांपासून रखडलेले अनुदान, १४ व्या वित्त आयोगाच्या तरतुदीबाबत सरपंच, सचिवांशी चर्चा, वेणी (गणेशपूर) ते मंगरुळ चवाळा रस्ता दुरुस्ती, वस्ती सुधार व पारधी घरकूल योजना आदी विषयावर चर्चा झाली.
यावेळी मंचावर आ.वीरेंद्र जगताप, गटविकास अधिकारी सूरज गोहाड, जि. प. सदस्य संगीता सवाई, पं.स. सदस्य सुधीर पाटेकर, सुधाकर डोंगरे, सविता सवाई, नगराध्यक्ष अक्षय पारसकर हे होते. चार तास चाललेल्या या सभेत तालुक्यातील सरपंच, सचिव, ग्रामसेवक व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अरविंद काळमेघ, जि. प.चे शाखा अभियंता आर. जे. बारेदार, विद्युत वितरण कंपनीचे सचिन पंचबुद्धे, नगर पंचायतचे मुख्याधिकारी नीलेश जाधव, जि.प. उपअभियंता आर. जे.पवार व विविध विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

तहसील कार्यालयाला कुलूप
आज तहसीलदार, नायब तहसीलदार, अधिकारी संघटना, महसूल कर्मचारी संघटनेचे लेखणीबंद आंदोलन सुरी होते. तहसील कार्यालयाला कुलूप होते. सोमवारी आयोजित केलेल्या दक्षता समिती, भ्रष्टाचार निर्मूलन समिती व महाराजस्व अभियानची सभा झाली नाही.

Web Title: Legislators know the problem