ग्रामपंचायतीतून घडलेले नेतुत्व पोहोचले झेडपी अन् विधानसभेपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:39 IST2021-01-08T04:39:12+5:302021-01-08T04:39:12+5:30
राजकीय वाटचाल : सभापती अन् आमदारांपर्यंत ठरले यशस्वी अमरावती : जिल्हा परिषद आणि विधानसभेपर्यंत प्रतिनिधित्व करणाऱ्या दिग्गज मंडळींचा ...

ग्रामपंचायतीतून घडलेले नेतुत्व पोहोचले झेडपी अन् विधानसभेपर्यंत
राजकीय वाटचाल : सभापती अन् आमदारांपर्यंत ठरले यशस्वी
अमरावती : जिल्हा परिषद आणि विधानसभेपर्यंत प्रतिनिधित्व करणाऱ्या दिग्गज मंडळींचा प्रवास हा ग्रामपंचायत सेवा सोसायटी खरेदी-विक्री कृषी उत्पन्न बाजार समिती पंचायत समिती, बँक, जिल्हा परिषद ते विधानसभेपर्यंत झालेला आहे. बळवंत वानखडे, बाळासाहेब हिंगणीकर दयाराम काळे आदींचे नेतृत्व ग्रामपंचायतीतून घडले आहे. यापूर्वीही जिल्ह्यात अनेकांचे नेतृत्व बहरले आहे.
ग्रामीण विकासाचे केंद्रबिंदू म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते काही अपवाद वगळता प्रत्येक राजकीय व्यक्तीची सुरुवात ही ग्रामपंचायतीपासून होते. काहीजण पंचायत समिती व जिल्हा परिषद पासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करतात. यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून पुढे गेलेल्या व्यक्तींनी जिल्हा परिषदे बरोबरच विधानसभेपर्यंत टप्पा गाठला आहे. ग्रामपंचायत सेवा सोसायटी खरेदी विक्री, कृषी उत्पन्न बाजार समिती पंचायत समितीत केलेल्या कामांच्या अनुभवाचा फायदा त्यांना नक्कीच सभागृहात झाल्याचे पाहावयास मिळते. स्थानिक पातळीवर काम केल्याने सामान्य माणसाच्या प्रश्नांची जाण त्यांना अधिक असते. ग्रामपंचायत सदस्य म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलेल्या वरील तीनही पुढाऱ्यांनी आपली राजकीय वाटचाल अजूनही सुरू ठेवली आहे. बळवंत वानखडे यांचा प्रवास लेहगाव सरपंचपासून सुरू झाला. त्यानंतर ते सेवा सोसायटी लेहगांव, थिलोरीचे सदस्य, दर्यापूर बाजार समितीचे संचालक अशा विविध संस्थांचे प्रतिनिधित्व केल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य पुन्हा सदस्य व झेडपीचे आरोग्य व वित्त सभापती या पदावरूनच आता आमदार असा प्रवास राहिला आहे. बाळासाहेब हिंगणीकर यांनी दर्यापुर तालुक्यातील हिंगणी मिर्झापूर या गावचे सरपंच म्हणून २० वर्ष काम केले. त्यानंतर त्यांनी विविध सहकारातील संस्थांवर सुद्धा प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय जिल्हा परिषदेत दोनदा प्रतिनिधित्व केले आहे . दुसऱ्यांदा त्यांना थेट आरोग्य व वित्त समितीचे सभापती म्हणून विराजमान होण्याचा बहुमान मिळाला. चिखलदरा तालुक्यातील गौरखेडा बाजारचे सरपंच म्हणून कारकीर्द गाजविलेल्या दयाराम काळे यांनी सेवा सोसायटीचे अध्यक्षपद भुषविले आहे. धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, पंचायत समितीचे सदस्य त्यानंतर सभापती, जिल्हा बँकेचे संचालक व आता जिल्हा परिषदेचे सदस्य त्यानंतर समाज कल्याण सभापतीपर्यंत झेप घेतली आहे.
बॉक्स
तसे घडले नेतृत्व
बळवंत वानखडे यांनी सर्व प्रथम दर्यापूर तालुक्यातील लेहगाव ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून कारभार सांभाळला. त्यानंतर लेहगाव व थिलोरी सेवा सोसायटीचे सदस्य, दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, जिल्हा परिषदेचे सलग दोनदा सदस्य यासोबतच आरोग्य व वित्त सभापती म्हणून कार्यरत असताना त्यांनी दर्यापूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविली आणि या मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करण्याची संधी त्यांना मिळाली आहे.
बॉस
बाळासाहेब हिंगणीकर यांचा हिंगणी मिर्झापूर ग्रामपंचायतीचे सरपंचपदापासून राजकीय प्रवास सुरू झाला. ते येथील सेवा सोसायटीचे अध्यक्ष, दर्यापूर खरेदी-विक्रीचे सहसचिव, उपाध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, जिल्हा परिषदेचे सदस्य आणि २०१७ मध्ये पुन्हा जिल्हा परिषद सदस्य व सध्या आरोग्य व वित्त सभापती म्हणून कार्यरत आहेत.
बॉक्स
चिखलदरा तालुक्यातील गौरखेडा बाजार येथील दयाराम काळे यांनी गावचे सरपंच पदापासून विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यानंतर धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, चिखलदरा पंचायत समितीचे सदस्य त्यानंतर दोनदा सभापती, जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक व २०१७ च्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य व त्यानंतर झेडपी समाजकल्याण समितीचे सभापती म्हणून सध्या कार्यरत आहेत.
बॉक्स
ही तर राजकीय पायाभरणी
ग्रामपंचायत सरपंचपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर त्या व्यक्तीस ग्रामीण भागाच्या समस्यांची जाण असते विकास कामे कशा पद्धतीने केली पाहिजे याचा चांगला अभ्यास झालेला असतो राजकारणातील बारकावे ही त्यांना चांगल्या पद्धतीने कळत असल्यामुळे ग्रामपंचायती ही तर राजकीय पायाभरणीच आहे, असे मत या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.