मुंबई- नागपूर बुलेट ट्रेनसाठी आज लीडार सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:14 IST2021-03-16T04:14:35+5:302021-03-16T04:14:35+5:30
अमरावती : मुंबई - नागपूर हाय स्पीड रेल कॉरिडॉर अर्थात बुलेट ट्रेनसाठी लीडार सर्वेक्षण सुरू करण्यात ...

मुंबई- नागपूर बुलेट ट्रेनसाठी आज लीडार सर्वेक्षण
अमरावती : मुंबई - नागपूर हाय स्पीड रेल कॉरिडॉर अर्थात बुलेट ट्रेनसाठी लीडार सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ७३६ किलोमीटर अंतराच्या या सर्वेक्षणाचे काम ठाण्यातून सुरू झाले. मंगळवार, १६ मार्च रोजी अकोला, कारंजा, अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा, धामणगाव रेल्वे येथील समृद्धी महामार्गालगत लीडार सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) तर्फे हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यासाठी असे सर्वेक्षण केले जात आहे. सोमवारी चार्टर विमानाने नाशिक ते अकोला दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. मंगळवार, १६ मार्च रोजी ते अकोला - नागपूर दरम्यान चित्रीकरण करणार आहे. ७३६ किलोमीटर अंतराच्या या प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे नागपूर, वर्धा, पुलगाव, कारंजा, मालेगाव, मेहकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, इगतपुरी आणि शहापूर ही शहरे जोडली जाणार आहेत.
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनचे महाव्यवस्थापक (ऑपरेशन्स) पंकज उके या विमानातून सर्वेक्षणात सहभागी असून ते मूळचे अमरावतीचे आहेत. त्यांनी अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. लीडार सर्वेक्षणात एका विमानाला लीडार आणि फोटो किंवा व्हिडीओ घेणारे सेन्सर्स लावलेले असतात. हे विमान हवेतून प्रस्तावित मार्गाचा लाईट डिटेक्शन अँड रेजिंग सर्वे म्हणजे लीडार सर्वे पूर्ण करते. त्यात प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या आजूबाजूच्या दीडशे मीटरपर्यंतच्या प्रदेशाचे हवाई चित्रीकरण केले जाते. त्यासाठी १०० मेगापिक्सल क्षमता असलेला कॅमेरा वापरला जातो. त्यानंतर त्याचा त्रिमिती म्हणजे थ्रीडी नकाशा तयार केला जातो. त्यामध्ये त्या मार्गाच्या आजूबाजूला असलेल्या इमारती, डोंगर, झाडे इत्यादी सर्व बारीक सारीक गोष्टी लांबी रुंदी उंचीनुसार म्हणजे त्रिमितीमध्ये बघता येतात. या बरोबरच प्रवासी संख्या आणि इतरही सर्वेक्षण केले जात असून ही सर्व माहिती संकलित झाल्यानंतर त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल रेल्वे मंत्रालयाला या वर्षातच सादर करण्यात येईल. या अतिभव्य प्रकल्पामुळे त्या- त्या परिसराचा सामाजिक- आर्थिक विकास मोठ्या प्रमाणावर आणि जलद गतीने होण्यास मदत होते. कोणत्याही रेखीय पायाभूत सुविधांच्या प्रकल्पात अशा सर्वेक्षणाला विशेष महत्त्व असते. नेहमीच्या पद्धतीने हा सर्वे केल्यास त्याला एक वर्षापेक्षा जास्त काळ लागतो. लीडार सर्वेक्षणमुळे हे काम तीन ते चार महिन्यांत पूर्ण होईल.
-----------------
अमरावती जिल्ह्यात या भागात होईल सर्वेक्षण
अमरावती जिल्ह्यातील समृद्धी महामार्गालगत लीडार सर्वेक्षण होणार आहे. यात धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्याचा समावेश आहे. मंगरूळ चव्हाळा, घुईखेड, वाढोणा, सावळा, आपटा, आसेगाव, तळेगाव, शेंदूरजना खुर्द या गावातून जाणाऱ्या ‘समृद्धी’चे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
-------------
नाशिक ते अकोला सर्वेक्षण पूर्ण झाले. मंगळवारी जालना ते कारंजा, धामणगाव, पुलगाव पुढे नागपूरपर्यंत सर्वे होईल. जमीन अधिग्रहणाची समस्या उद्भवू नये, यासाठी समृद्धी महामार्गालगत सर्वेक्षणाला प्राधान्य दिले जात आहे.
-पंकज उके, महाव्यवस्थापक, नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड