एलबीटी हद्दपार; दर कायम
By Admin | Updated: August 2, 2015 00:34 IST2015-08-02T00:34:27+5:302015-08-02T00:34:27+5:30
राज्य शासनाने व्यापाऱ्यांची स्थानिक संस्था करा (एलबीटी) तून सुटका केली असली तरी बाजारपेठेत जुन्याच दरात वस्तू, साहित्याची विक्री केली जात आहे.

एलबीटी हद्दपार; दर कायम
पिळवणूक : व्यापारीमुक्त, जनतेला केव्हा मिळणार दिलासा ?
अमरावती : राज्य शासनाने व्यापाऱ्यांची स्थानिक संस्था करा (एलबीटी) तून सुटका केली असली तरी बाजारपेठेत जुन्याच दरात वस्तू, साहित्याची विक्री केली जात आहे. एलबीटी बंद झाल्यामुळे व्यापाऱ्यांना न्याय मिळाला असला तरी जनतेला दिलासा केव्हा मिळेल, असा सवाल उपस्थित होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून म्हणजे १ आॅगस्टपासून राज्यातून एलबीटी रद्द झाल्याची घोषणा केली. यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला. या घोषणेच्या अनुषंगाने महापालिकांनी व्यापाऱ्यांकडून एलबीटी वसुलीची प्रक्रिया गुंडाळली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शहरातील सुमारे १० हजार व्यापारी मुक्त झाले आहेत. मात्र, शहरातील बाजारपेठेत अद्यापही एलबीटीसह वस्तुंचे दर आकारले जात असल्याने जनतेची लूट होत आहे.
एलबीटीमुळे शहरातील व्यापार संपुष्टात येत असल्याची व्यापाऱ्यांची ओरड व्यापाऱ्यांची होती. त्यामुळेच राज्यात सत्तेवर आल्यास एलबीटीतून व्यापाऱ्यांची सुटका केली जाईल, असे आश्वासन भाजपच्या नेत्यांनी दिले होते. या आश्वासनाची पूर्तता देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. एलबीटी बंद करताना व्यापाऱ्यांना अभय योजनेचा लाभ मिळावा, यासाठी १५ आॅगस्टपर्यंत अभय योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. व्यापाऱ्यांचे हित जोपासले पाहिजे, यात दुमत नाही. मात्र, जनतेलाही दिलासा मिळायला हवा.