भूस्खलनाचा धोका!
By Admin | Updated: August 9, 2014 00:05 IST2014-08-08T23:43:21+5:302014-08-09T00:05:19+5:30
बुलडाणा शहराच्या सिमारेषेवरील वस्त्या धोकेदायक; माळीण गावाच्या पुनरावृत्तीचा धोका.

भूस्खलनाचा धोका!
सिद्धार्थ आराख /बुलडाणा
बुलडाणा शहराच्या सिमारेषेवर जवळपास १0 वस्त्या अशा आहेत की एखादी नैसर्गीक आपत्ती आल्यास येथेही पुणे जिल्ह्यातील माळीण गावाची पुनरावृत्ती होऊ शकते. माळीण गावावर डोंगर कोसळल्यामुळे हे गाव पुर्णत: मलब्याखाली गेले. बुलडाणा शहराच्या आजूबाजूला डोंगर दर्यामध्ये ज्या वस्त्या आहेत तेथे भुस्सखलन झाल्यास ही घरे दरीमध्ये कोसळण्याची भिती आहे. असे झाल्यास या भागात बचाव पथकाला घटनास्थळावर पोहचणे सुध्दा जिकरीचे होईल.अशी स्थिती या परिसराची आहे. या संभाव्य आपत्तीचा धोका ओळखून प्रशासनाने उपाय योजना करणे गरजेचे आहे. किमान अशा धोकादायक झोपड्या वाढणार नाही याची काळजी प्रशासनाने घेणे आवश्यक झाले आहे. दिवसेंदिवस दरीच्या काठावरील घरांची गर्दी वाढतच आहे.
*टेकड्यांची झीज धोकादायक
शहराच्या पश्चिम व दक्षिणेकडील टेकड्यांची झीज झाली आहे. जुन्या सागर व्हिडीओच्या पाठीमागील भाग, सम्राट अशोक नगरचा काही भाग तर इकडे मुठ्ठे ले-आऊटच्या काही भागातील टेकड्यावर सुध्दा अशी धोकादायक घरे आहेत. तर सागवन रस्त्यावरील टेकड्यावर प्लॉट पाडून लोकांनी घरे बांधली आहेत. असाच प्रकार सुंदरखेड विजय नगर भागासह संगम तलावाच्या काठावर आहे. या भागात सुध्दा अनेकांची घरे टेकड्यांच्या पायथ्याशी गेले आहेत. हा भाग फारसा धोकादायक नसला तरी हळु हळु या टेकड्यांची झीज झाल्यास या घरांना धोका होऊ शकतो. यासाठी रहिवासीयांनी स्वत: पुढाकार घेऊन सुरक्षित स्थळी जाणे गरजेचे आहे.
*कपार खोदून बांधली घरे
बुलडाणा शहराच्या उत्तरेकडील भागात आतारी नामक वस्ती आहे. वनखात्याच्या जमीनीवर डोंगर दर्यामध्ये लोकांनी अवैधरित्या घरे बांधून येथे अतिक्रमण केले आहे. हा परिसर सुध्दा धोकादायक आहे. त्यापुढे हिंदु स्मशानभुमिला लागून अनेक लोकांनी टेकडीच्या पायथ्याशी झोपड्या बांधल्या आहेत. त्याला लागूनच पुढे भीमनगर मधील अनेक नागरीकांनी डोंगर कपार्यात अवैध घरे बांधली आहेत. त्यांच्या घरापर्यंत जाणे म्हणजे कसरत करावी लागते. बाजूलाच सिनेमा टॉकीजच्या पाठीमागील भागात सुध्दा टेकड्यांच्या कपार्यामध्ये अनेकांची घरे आहेत.
*सपाटीकरण करून बांधल्या झोपड्या
बुलडाणा शहराच्या पुर्वेकडील भागात क्रांती नगरला लागून असलेल्या कत्तलखान्याच्या पाठीमागे मोठी दरी आहे. या दरीच्या पुढे जंगल आहे. या कत्तलखान्याच्या खाली दरीत आता जमीन सपाट करून लोकांनी अवैधरित्या घरे बांधून वस्ती केली आहे. विशेष म्हणजे या भागात जाण्यासाठी चांगला रस्ता नाही. त्याला लागूनच असलेल्या मिर्झा नगर भागात सुध्दा दरीमध्ये जावाई नगर म्हणून स्वतंत्र वस्ती तयार करण्यात आली आहे.या दरीच्या खालच्या भागात टेकड्यांचे सपाटीकरण करून लोकांनी टीनपत्र्यांची घरे बांधली आहेत. आग लागल्यास किंवा दुर्दैवाने एखादी नैसर्गीक आपत्ती कोसळल्यास या भागात कोणतेही वाहान जावू शकत नाही. रस्ता नाही, नाल्या नाहीत त्यामुळे लोकांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत.
*नगर पालिका मात्र अनभिज्ञ
बुलडाणा पालिकेच्या क्षेत्रात असलेल्या या वस्त्यांची मात्र पालिकेच्या दप्तरी कोणतीही नोंद नाही. अशा धोकादायक वस्त्या आहेत काय? असल्यास त्यांची काय स्थिती आहे. तेथील नागरीकांच्या जिविताला काही धोका होऊ शकतो काय, याची सुध्दा महिती पालिकेला नाही. बुलडाणा नगर पालिका मुख्याधिकारी संजीव ओव्हळ यांनी डोंगर दर्यामध्ये अवैधरित्या घरे बांधलेल्या नागरीकांची स्वतंत्र अशी नोंद नसल्याचे सांगीतले. माळीणच्या घटनेनंतर अशा धोकादायक घराची नोंद ठेवण्यासाठी आता स्वतंत्र व्यवस्था करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.