बांधकाम, नगररचना विभागात समन्वयाचा अभाव
By Admin | Updated: July 30, 2014 23:46 IST2014-07-30T23:46:28+5:302014-07-30T23:46:28+5:30
शासनाकडून विकास कामांसाठी कोट्यवधी रुपये आले असताना महापालिकेतील बांधकाम आणि सहायक संचालक नगररचना विभागातील समन्वयाच्या अभावामुळे कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत,

बांधकाम, नगररचना विभागात समन्वयाचा अभाव
लोकप्रतिनिधी नाराज : ‘स्मार्ट सिटी’ पुरस्काराने अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा
अमरावती : शासनाकडून विकास कामांसाठी कोट्यवधी रुपये आले असताना महापालिकेतील बांधकाम आणि सहायक संचालक नगररचना विभागातील समन्वयाच्या अभावामुळे कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत, असा आरोप करुन लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर प्रचंड नाराजी वर्तविली. मात्र, महापालिकेला ‘स्मार्ट सिटी’ पुरस्कार मिळाल्याबद्दल आयुक्त अरुण डोंगरे यांचा आ. रावसाहेब शेखावत यांनी बुधवारी सत्कार करुन कौतूकदेखील केले.
महापालिकेत आयुक्तांच्या दालनामध्ये बुधवारी विविध विकास कामांच्या आढाव्यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत शहरात सुरु असलेल्या विकासकामांच्या परिस्थितीबाबत मंथन करण्यात आले. स्थानिक बाबा चौक ते लेखुमल मिठाईवाला चौकापर्यंत सुरु असलेले रस्ता निर्मितीचे बांधकाम आणि सहायक संचालक नगररचना विभागाच्या समन्वयाअभावी काम पूर्ण झाले नसल्याचा आरोप करण्यात आला. सामाजिक न्याय विभागाच्या अनुदानातील मंजूर घरकुलांचा विषय हाताळताना शेखावत यांनी गरिबांना त्यांच्या हक्काचे घरकूल देण्यास दिरंगाई करणाऱ्यास धडा शिकविला जाईल, अशी तंबी दिली. शहरात नियमबाह्य उभारले जाणाऱ्या मोबाईल टॉवरवर अंकुश ठेवण्याचे निर्देश आयुक्तांना दिले. राजकमल चौक व गर्ल्स हायस्कूल चौकात सौंदर्यीकरणाची कामे लवकरच सुरु करण्याचे ठरविण्यात आले. पंधरवाड्यात सौंदर्यीकरणाला सुरूवात करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. विकास कामे त्वरित पूर्ण करुन जनतेला दिलासा मिळावा, या अनुषंगाने कार्यवाहीच्या सूचना दिल्यात. बैठकीला महापौर वंदना कंगाले, आयुक्त अरुण डोंगरे, अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम, सुगनचंद गुप्ता, विलास इंगोले, संजय अकर्ते, नगरसेवक भारत चव्हाण, अमोल ठाकरे, नगर रचना अधिकारी सुरेंद्र कांबळे, अभियंता पोतदार उपस्थित होते.