विनापरवानगी ॲन्टिजेन टेस्ट करणाऱ्या लॅबला ५० हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:20 AM2021-02-23T04:20:46+5:302021-02-23T04:20:46+5:30

अमरावती : खासगी प्रयोगशाळांकडून होणारी ॲन्टिजेन टेस्टची प्रक्रिया यापूर्वीच रद्द केली आहे. मात्र, रुग्णाच्या घरी जाऊन ॲन्टिजेन टेस्ट करून ...

Lab fined Rs 50,000 for testing antigen without permission | विनापरवानगी ॲन्टिजेन टेस्ट करणाऱ्या लॅबला ५० हजारांचा दंड

विनापरवानगी ॲन्टिजेन टेस्ट करणाऱ्या लॅबला ५० हजारांचा दंड

Next

अमरावती : खासगी प्रयोगशाळांकडून होणारी ॲन्टिजेन टेस्टची प्रक्रिया यापूर्वीच रद्द केली आहे. मात्र, रुग्णाच्या घरी जाऊन ॲन्टिजेन टेस्ट करून त्यांना पॉझिटिव्ह असल्याबाबत लेखी रिपोर्ट न देता तोंडी माहिती देऊन रुग्णालयात पाठविणाऱ्या येथील एका पॅथॉलॉजी लॅबला ५० हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्या अहवालावरून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ही कारवाई केली. या लॅबला रॅपिड ॲन्टिजन टेस्ट थांबविण्याबाबत व अशी चाचणी करण्याची लॅबची मान्यता रद्द करत असल्याबाबत आरोग्य प्रशासनाने यापूर्वीच पत्र दिले होते. त्यानंतरही लॅबकडून ॲन्टिजन टेस्ट केली जात असून, केवळ तोंडी माहिती देऊन रुग्णाची बोळवण केली जात असल्याचे विभागीय संदर्भ रुग्णालयाला आढळून आले.

त्यावरून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपेश खडसे व डॉ. सोपान भोंगाडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालावरून या पॅथॉलॉजी लॅबोरेटरीमध्ये विनापरवानगी ॲन्टिजेन टेस्ट केली जात असल्याचे जिल्हा प्रशासनाला आढळून आले. त्यावरून जिल्हा दंडाधिकारी यांनी ५० हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.

त्यानुसार या रकमेचा भरणा सात दिवसांच्या आत महापालिकेकडे करावा आणि येथून पुढे कोणत्याही प्रकारचे विधीग्राह्य नसलेले कृत्य केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, तसेच लॅबोरेटरी बंद करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आदेशान्वये देण्यात आला आहे.

बॉक्स

असा उघड झाला प्रकार

येथील एका कुटुंबाने कोरोना चाचणी करण्याबाबत एका पॅथॉलाजी लॅबला दूरध्वनीद्वारे विनंती केली. त्यानुसार लॅबच्या प्रतिनिधीने त्यांच्या घरी येऊन रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केली. त्यानंतर लॅबच्या प्रतिनिधीकडून या दोन्ही व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे व सुपर स्पेशालिटी रूग्णालय येथे दाखल होण्याबाबत तोंडी सांगण्यात आले. लॅबतर्फे या कुटुंबाला कुठलाही लेखी रिपोर्ट देण्यात आला नाही. त्यानंतर हे कुटुंबीय सुपर स्पेशालिटी रुग्णालय भरती होण्यासाठी गेले असता हॉस्पिटलने रिपोर्टची मागणी केली.त्यावेळी हा प्रकार उघड झाला.

Web Title: Lab fined Rs 50,000 for testing antigen without permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.