वडिलांची जाळून हत्या करणाऱ्या कुपुत्रास अटक

By Admin | Updated: September 23, 2016 00:18 IST2016-09-23T00:18:05+5:302016-09-23T00:18:05+5:30

वृद्ध वडिलांनी शेतजमीन विक्रीला काढल्यावर पैशांच्या वाटणीवरून झालेल्या वादात थेट पित्याच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळणाऱ्या

The Kuputras who burned the father's fire were arrested | वडिलांची जाळून हत्या करणाऱ्या कुपुत्रास अटक

वडिलांची जाळून हत्या करणाऱ्या कुपुत्रास अटक

कारवाई : शिरखेडात महिनाभरापासून होेता लपून
परतवाडा : वृद्ध वडिलांनी शेतजमीन विक्रीला काढल्यावर पैशांच्या वाटणीवरून झालेल्या वादात थेट पित्याच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळणाऱ्या फरार पूत्राला शिरजगाव पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री २ वाजता शिरखेड येथून अटक केली. विनोद पांडूरंग मोहोड (३८,रा. कारंजा बहिरम) असे आरोपीचे नाव आहे.
पांडुरंग बन्सी मोहोड (६५) असे मृताचे नाव आहे. शिरजगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद मोहोड याचा पैशांसाठी वडील पांडूरंग मोहोड यांच्यासोबत ८ आॅगस्ट २०१६ रोजी वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या विनोदने वडिलांना रॉकेल टाकून जिवंत पेटवून दिले. हा प्रकार कारंजा बहिरम येथे घडल्याने उपस्थित काहींनी पोलिसांच्या मदतीने भाजलेल्या पांडूरंग मोहोड यांना दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले. मृत्युपूर्व बयाणात त्यांनी मुलगा विनोद याने अंगावर रॉकेल टाकून पेटविल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावर पोलिसांनी सुरूवातीला हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तपास आरंभला. मात्र, भाजलेल्या पांडूरंग मोहोड यांचा उपचारादरम्यान ४ दिवसांत मृत्यू झाला. त्यावरून पोलिसांनी विनोदविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. (तालुका प्रतिनिधी)

महिनाभरापासून फरार, शिताफीने अटक
पैशासाठी पित्याच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळणारा क्रुरकर्मा आरोपी विनोद घटनेनंतर पसार झाला होता. पोलिसांनी राज्यासह बाहेरील पोलीस स्टेशनमार्फत शोधपत्रिका काढून त्याची शोधमोहीम चालविली होती. मात्र, त्याचा पत्ता लागत नव्हता. अखेर बुधवारी आरोपी विनोद हा मोर्शी तालुक्यातील शिरखेड येथे त्याच्या दुसऱ्या पत्नीकडे लपून बसल्याची गोपनीय माहिती शिरखेड पोलिसांनी शिरजगाव पोलिसांना दिली. त्यावरून अटकेचा सापळा रचण्यात आला. बुधवारी मध्यरात्री २ वाजता विनोदला मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली. गुरूवारी त्याला न्यायालयात हजर करण्याची तयारी वृत्त लिहेस्तोवर सुरू होती. पोलीस कोठडीत चौकशीनंतर अनेक नवीन खुलासे होणार आहेत.

पहिल्याच दिवशी दबंगगिरी
शिरजगाव पोलीस ठाण्यात बुधवारी नव्यानेच ठाणेदार मुकुंद कवाडे यांनी ठाणेदारपदाची धुरा सांभाळली आणि रूजू होताच कारवाईचा धडाका चालविला. शिरजगाव पोलीस स्टेशन परिसर संवेदनशील असून मध्य प्रदेश सीमेवर आहे, हे विशेष.

वडिलांना रॉकेल टाकून जिवंत जाळल्यानंतर आरोपी एक महिन्यापासून पसार होता. शिरखेड येथे तो लपून बसल्याच्या माहितीवरून त्याला अटक करण्यात आली.
- मुकुंद कवाडे,
ठाणेदार, शिरजगाव कसबा

Web Title: The Kuputras who burned the father's fire were arrested