लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भाजपचे नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आरोपानुसार अमरावती जिल्ह्यातील सर्वच तहसील अंतर्गत नागरिकांचे जन्म, मृत्यू दाखल्यांची पडताळणी झाली. महसूल प्रशासनाने जन्म-मृत्यू दाखल्याची चौकशी केली असता एकही बांग्लादेशी, पाकिस्तानी नागरिक आढळून आला नाही. असे असताना विशिष्ट समुदायाला टार्गेट केले जात असल्याचा आरोप मंगळवारी काँग्रेस नेत्यांनी पत्रपरिषदेतून केला. दरम्यान, शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त अरविंद चावरीया यांची भेट घेत वस्तुस्थिती मांडली.
खासदार बळवंत वानखडे यांच्या माहितीनुसार किरीट सोमय्या यांनी गत काही महिन्यांपूर्वी अमरावती जिल्ह्याचा दौरा केला असता अंजनगाव सुर्जी तालुक्यात बांग्लादेशी, पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असून त्यांना नियमबाह्य जन्म-मृत्यू दाखले देणारे रॅकेट असल्याचा आरोप केला होता. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमली होती आणि जिल्ह्यातील १४ तहसीलदार आणि ५ नायब तहसीलदार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. आक्षेप घेण्यात आलेल्या जन्म मृत्यू प्रमाणपत्राची समितीकडून पडताळणी करण्यात आली. यात एकही बांग्लादेशी, पाकिस्तानी नागरिक आढळून आला नाही.
एवढेच नव्हे तर 'महसूल'ने हे प्रमाणपत्र योग्य असल्याचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. असे असताना महसूल प्रशासनामार्फत देण्यात येणारे जन्म, मृत्यू दाखले देण्यास स्थगिती आहे. त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागात शिक्षणासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची बाब खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी लक्षात आणून दिली. किंबहुना भाजपा नेते जिल्हा प्रशासन आणि पोलिसांवर दबाव टाकत आहेत. किरीट सोमय्या यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्याची शांतता भंग होत आहे. या आधी काँग्रेसकडून पोलिस आयुक्तांनाही निवेदन दिले गेले आहे. पत्रपरिषदेतून माजी मंत्री यशोमती ठाकूर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, शहर अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले उपस्थित होते.
पोलिस आयुक्तांशी भेटले काँग्रेसचे पदाधिकारी
मंगळवारी काँग्रेसच्या एका प्रतिनिधी मंडळाने अमरावती पोलिस आयुक्तालयात पोलिस आयुक्त अरविंद चावरीया यांची भेट घेतली. किरीट सोमय्यांच्या अमरावती दौऱ्यामुळे जिल्ह्याची बदनामी, लोकांना झालेली असुविधा व विद्यार्थ्यांचे नुकसान याबाबत माहिती दिली.
किरीट सोमय्यांचे काय आहे ?
काँग्रेस नेते आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या किरीट सोमय्या ना मंत्री आहेत, ना आमदार. मग कोण आहेत जे पोलिस आणि प्रशासनावर दबाव टाकून लोकांवर जबरदस्तीने केस दाखल करण्यासाठी सांगत आहेत? तरीही प्रशासनाकडून माहिती दिली गेली की एकही बांग्लादेशी आणि पाकिस्तानी नागरिक अमरावती जिल्ह्यात नाहीत. तरीही ते अमरावतीत येऊन खोटे आरोप करत आहेत. येथेच त्यांना शांतता भंग करायची तर नाही ना? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.