रघुवीरमधील कामगारांच्या वैद्यकीय तपासणीला ‘खो’
By Admin | Updated: September 22, 2016 00:12 IST2016-09-22T00:12:04+5:302016-09-22T00:12:04+5:30
रघुवीरमधील कचोरीत आढळलेल्या अळीमुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रघुवीरमधील कामगारांच्या वैद्यकीय तपासणीला ‘खो’
एफडीए : ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
अमरावती : रघुवीरमधील कचोरीत आढळलेल्या अळीमुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, त्यापेक्षाही गंभीर प्रकार म्हणजे रघुवीरमधील कामगारांची नियमित वैद्यकीय तपासणीच केली जात नसल्याचे निरीक्षण अन्न व औषधी प्रशासनाने नोंदविले आहे. आजारी असलेले कामगार खाद्यान्न बनवितात किंवा ग्राहकांना सर्व्ह करतात, या प्रकाराने लाखो ग्राहकांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो.
शाम चौकस्थित रघुवीर प्रतिष्ठानातील कचोरीत अळी आढळल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित करताच शहरात खळबळ उडाली. वृत्ताची दखल घेत एफडीएच्या अधिकाऱ्यांनी रघुवीर प्रतिष्ठानासह मुख्य कारखान्यावर धाड टाकली. तेथील खाद्यान्न व कच्च्या मालाची तपासणी करून नमुने घेतले. दरम्यान ज्या ठिकाणी खाद्य पदार्थ बनविले जातात, त्या परिसराची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये त्यांना अनेक प्रकारच्या त्रुट्या आढळून आल्या. नियमावलीनुसार रघुवीरमधील कामकाज चालत नसल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. यावेळी एफडीए अधिकाऱ्यांनी कामगारांच्या वैद्यकीय तपासणीसंदर्भात चौकशी केली असता त्यांची नियमीत वैद्यकीय तपासणी होत नसल्याचे निदर्शनास आले. कामगारांची वैद्यकीय तपासणी न केल्यामुळे रघुवीरचे संचालक अधिकाऱ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र दाखविण्यास असमर्थ ठरले. याबाबत एफीएच्या अधिकाऱ्यांनी नोंद घेतली आहे. रघुवीरमधील कामगार हॅन्डग्लोजविना खाद्यान्न तयार करतात, अन्य कामगार तेच खाद्य पदार्थ ग्राहकांना पुरवितात. या कामगारांपैकी काही कामगार संसर्गजन्य आजाराने ग्रस्त असतील व ते खाद्यान्न तयार करत असतील, तर रघुवीरने ग्राहकांचे आरोग्यच पणाला लावले असल्याचे निरीक्षण अधिकाऱ्यांनी नोंदविले.
रघुवीर प्रतिष्ठानाची तपासणीदरम्यान अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. तेथील कच्चा मालाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अहवालानंतर पुढील कारवाई दिशा निश्चीत केली जाईल.
- जयंत वाणे,
प्रभारी सहायक आयुक्त, (अन्न).