पावसाअभावी खरीप पेरणी माघारली
By Admin | Updated: June 26, 2016 00:07 IST2016-06-26T00:07:22+5:302016-06-26T00:07:22+5:30
मान्सूनच्या पहिल्या पावसाचे २० जूनला आगमन झाल्यानंतर दडी मारली यामुळे जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या माघारल्या.

पावसाअभावी खरीप पेरणी माघारली
पाऊस नसल्याचा परिणाम : १४ हजार ३०० हेक्टरमध्ये पेरणी
अमरावती : मान्सूनच्या पहिल्या पावसाचे २० जूनला आगमन झाल्यानंतर दडी मारली यामुळे जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या माघारल्या. यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ७ लाख २९ हजार ८०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. सद्यस्थितीत १४ हजार ३०० हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. क्षेत्राची ही फक्त दोन टक्केवारी आहे.
जिल्ह्यात साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी पावसाचे आगमन होऊन पेरणीला सुरुवात होते व जूनअखेरीस पूर्ण पेरणी होऊन जाते अशी परंपरा आहे. आता जून ऐवजी जुलै महिन्यात पेरणी सुरू होऊन आॅगस्ट महिन्यापर्यंत पेरणी सुरू राहत आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १४ हजार ८०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. हे क्षेत्र सिंचनाची सुविधा असणारे क्षेत्र आहे. कोरडवाहू क्षेत्रातील पेरणीला अद्याप सुरुवात नाही. हवामान खात्याने २६ जूननंतर पेरणीयोग्य पावसाची शक्यता असल्याचा अंदाज दिलेला आहे व कृषी विभागाने देखील २६ जूननंतर पेरणी करावी अन्यथा दुबार पेरणीची शक्यता असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी धानासाठी ४ हजार ३०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असताना पेरणी क्षेत्र निरंक आहे. ज्वारीसाठी ३७ हजार ६०० हेक्टर क्षेत्र असताना १०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. बाजरीसाठी २०० हेक्टर क्षेत्र असून पेरणी क्षेत्र निरंक आहे. मक्यासाठी १२०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. पेरणीक्षेत्र निरंक आहे. तुरीसाठी १ लाख १४ हजार क्षेत्र असून २१ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. उडीदासाठी ५३ हजार हेक्टर क्षेत्रापैकी १०० हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. खरीप भुईमुगाचे क्षेत्र यंदा निरंक आहे. तीळ ५०० हेक्टर क्षेत्रात निरंक आहे. सूर्यफुल निरंक, सोयाबीनसाठी ३ लाख २३ हजार ३०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असताना ४६०० हेक्टर क्षेत्रात सध्या पेरणी झालेली आहे. कपाशीसाठी १ लाख ९३ हजार २०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असताना ७ हजार ३०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे.
१ ते २५ जूनदरम्यान ६२.३ मि.मी. पाऊस
जिल्ह्यात १ ते २५ जूनदरम्यान पावसाची अपेक्षित सरासरी ११६.८ मि. मी. आवश्यक असताना ६२.६ मि. मी. पाऊस झाला. या ५३.३ टक्केवारी आहे. ९० मि.मी. पाऊस चिखलदरा, अमरावती ४३, भातकुली ४२.२,नांदगाव ७३.३, चांदूररेल्वे ७९.६, धामणगाव ५८.३, तिवसा ८१.८, मोर्शी ४२, अचलपूर ४७.८, चांदूरबाजार ३७.६, दर्यापूर ७५.७, अंजनगाव ७३.३, धारणी ८४.१ मि. मी. पाऊस पडला आहे.
कपाशी वरचढ, सोयाबीन माघारले
दरवर्षी सोयाबीनचे पेरणी क्षेत्र अधिक राहून पेरणीच टक्का अधिक असतो. यंदा मात्र उलट आहे. सोयाबीन सद्यस्थितीत ४६०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. हे केवळ १ टक्के पेरणी क्षेत्र आहे. याउलट कपाशीची ७ हजार ३०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. ४ टक्के पेरणीक्षेत्र आहे.