शिरजगावात कार्तिक स्वामी त्रिजटा उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:17 IST2020-12-05T04:17:44+5:302020-12-05T04:17:44+5:30
फोटो पी ०३ शिरजगाव कसबा शिरजगाव कसबा : चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथे एक शतकापासून कार्तिक स्वामी त्रिजटा ...

शिरजगावात कार्तिक स्वामी त्रिजटा उत्सव
फोटो पी ०३ शिरजगाव कसबा
शिरजगाव कसबा : चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथे एक शतकापासून कार्तिक स्वामी त्रिजटा उत्सव दरवर्षी साजरा केला जात आहे. विदर्भात कार्तिकस्वामींचे भुयारातील मंदिर केवळ येथेच आहे. ३ डिसेंबर रोजी कोरोना प्रतिबंधक नियम पाळत गावकरी भक्तमंडळींनी हा उत्सव गर्दी होऊ न देता साजरा केला.
मेघा नदीच्या काठावर सातपुडा पर्वताशेजारच्या शिरजगाव कसबा स्थित कार्तिक स्वामी त्रिजटा उत्सवाला शिवपुराणातील पौराणिक संदर्भ आहे. दरवर्षी त्रिजटा उत्सवाला पौर्णिमेच्या तिसऱ्या दिवशी विदर्भातील लाखो भाविक एकत्र येत असतात. गावातील प्रत्येक भागातून महिनाभर काकड दिंडीद्वारे सकाळी काकड आरती काढली जाते व त्रिजंठा उत्सवाला रथ काढून कार्तिक स्वामी मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर दहीहंडी केली जाते व नंतर सर्व भाविक महाप्रसाद घेतात. या रथोत्सवात फुलांनी सजविलेले ४० ते ५० भव्य रथ सहभागी असतात. शिरजगावातील सासरी गेलेल्या मुली दिवाळीला न येता या त्रिजटा उत्सव पाहण्यासाठी गावात येत असतात. लाखो भाविकांची या महोत्सवाला उपस्थिती असते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी रथोत्सवाला परवानगी दिली नाही. यामुळे कार्तिक स्वामी भक्त मंडळींनी राम, लक्ष्मण, हनुमान वेशातील मुलांना खांद्यावर घेऊन कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले. गर्दी न करता दहीहंडी फोडून महाप्रसादाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.