कर्जापायी मुलगा गेला.. तरीही कर्ज कायमच!
By Admin | Updated: December 21, 2014 22:52 IST2014-12-21T22:52:23+5:302014-12-21T22:52:23+5:30
गेल्यावर्षी लहान मुलाने शेतीवरच्या कर्जापायी आत्महत्या केली. शासनातर्फे एक लाखाची मदत मिळाली; तथापि कर्जाची रक्कम कायम होती. मोठ्या मुलाने पुण्यातील एका कारखान्यात रात्रंदिवस

कर्जापायी मुलगा गेला.. तरीही कर्ज कायमच!
मोर्शी : गेल्यावर्षी लहान मुलाने शेतीवरच्या कर्जापायी आत्महत्या केली. शासनातर्फे एक लाखाची मदत मिळाली; तथापि कर्जाची रक्कम कायम होती. मोठ्या मुलाने पुण्यातील एका कारखान्यात रात्रंदिवस नोकरी करुन कर्ज फेडले. मात्र, अतिश्रमामुळे त्याला रक्तदाबासह कंबरेच्या हाडाचा आजार बळावला आणि त्याला नोकरी सोडावी लागली.
ही परिस्थिती आहे नजीकच्या पार्डी या गावातील रुपेश विकासराव मोंढे या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची. विकास मोंढे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वडिलांचे नाव आहे. त्यांचेकडे साडेतीन एकर शेत आहे. विकासराव यांच्यावर आता पावेतो दोन शस्त्रक्रिया झाल्या. त्यामुळे त्यांचेकडून शेतीचे काम होत नाही. विकासरावांना दोन मुले आहेत. लहान रुपेश हा शेती पाहत होता. शेती लहान्याने सांभाळली. शिवाय अवघ्या साडेतीन एकरावर कुटूंबाचा उदरनिर्वाह होवू शकत नाही, या भावनेने मोठा मुलगा पंकज याने पुण्यातील एका कारखान्यात नोकरी स्वीकारली होती.
पार्डी शिवारात असलेल्या शेती पिकावर जंगली जनावरांचा होणारा प्रादूर्भाव रोखण्याकरिता या कुटुंबाने शेतीला तारेचे कंपाऊंड भरले. त्यासाठी त्यांनी स्थानिक बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेतून कर्ज घेतले होते. शिवाय पीक कर्जही होते. सातत्याने नापिकीमुळे ते कर्ज परतावा करु शकले नाही. त्यांचेकडे १ लक्ष ८८ हजार रुपये व्याजासह थकीत होते. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पीक हातचे गेले. त्यातच बँकेच्या कर्जाचे ओझे असल्यामुळे त्रस्त होऊन त्याने २५ आॅगस्ट २०१३ ला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येची नोंद महसूल विभागात झाली. तपासणीअंती ही आत्महत्या पात्र समजण्यात आली. ३० हजार रूपये रोख आणि ७० हजार रुपयांचे बचत प्रमाणपत्र रूपेशच्या वडिलांच्या नावाने काढण्यात आले. रुपेशचा जीव गेला असला तरी कर्ज मात्र फिटले नव्हते. आत्महत्येची धग काही अंशी कमी होताच कर्ज परताव्याकरिता बँकेचे अधिकारी या कुटूंबाकडे जावू लागले. वडीलोपार्जीत शेत जमीन वाचविण्याकरीता पुण्यातील कारखान्यात कामगार म्हणून कार्यरत रुपेशचा मोठा भाऊ पंकजने कंबर कसली. दोन पाळयात काम करुन त्याने बँकेचे कर्ज तडजोड करुन फेडले. मात्र, तब्येतीमुळे त्याची नोकरी गेली. यावर्षी विकासरावांनी शेत नातेवाईकाला पेरण्याकरिता दिले. सर्व खर्च या नातेवाईकांनी केला. साडेतीन एकरात कपाशी पेरली. परंतु पावसाच्या अनियमिततेमुळे आतापर्यंत ४ क्विंटल कापूस हाती आला आहे. त्यातही नातेवाईकांचा हिस्सा पडणार आहे.