Kalingad of Achalpur went to the kingdom of 'Didin'; It also prevailed in the south including Jammu and Kashmir | अचलपूरचे कलिंगड निघाले 'दीदीं'च्या राज्यात; जम्मू-काश्मीरसह दक्षिणेतही बोलबाला

अचलपूरचे कलिंगड निघाले 'दीदीं'च्या राज्यात; जम्मू-काश्मीरसह दक्षिणेतही बोलबाला

ठळक मुद्दे लॉकडाऊनचा फटका, केवळ उत्पादनखर्चच निघाला

अनिल कडू

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : अचलपूर तालुक्यातील निजामपूर येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात उत्पादित केलेले कलिंगड (टरबूज) ममतादीदींच्या राज्यात पाठविले आहे. यासह जम्मू-काश्मीर आणि दक्षिणेतही या कलिंगडाने आपली ओळख निर्माण केली आहे.

निजामपूर येथील शेतकरी सुरेंद्र काटोलकर यांनी अडीच एकर शेतात कलिंगडाची लागवड केली. मागील दोन वर्षांपासून ते कलिंगडाची लागवड करीत आहेत. एकरी २२ टन अपेक्षित उत्पादन विचारात घेता, त्यांना अडीच एकरात एकूण ५५ टन उत्पादन अपेक्षित आहे.

यापूर्वी सुरेंद्र काटोलकर यांच्या उत्पादित कलिंगडाला नऊ ते दहा रुपये प्रतिकिलो भाव मिळाला आहे. आज मात्र लॉकडाऊनमुळे कलिंगडाचे भाव घसरले असून, जागेवर शेतातून केवळ साडेपाच ते सहा रुपये प्रतिकिलो दराने त्यांना हे कलिंगड विकावे लागत आहे. उत्पादन होऊनही त्यांना आर्थिक फायदा न न होता, केवळ उत्पादन खर्च निघत असल्याचे समाधान त्यांना मानावे लागले आहे. त्यांच्या शेतातून त्यांनी व्यापाऱ्याच्या मदतीने सरळ कलिंगड भरलेला ट्रक ममतादीदींच्या पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यावरून पुढे नव्वद किलोमीटरवर पाठविला आहे. या ट्रकपूर्वी एक ट्रक कलिंगड त्यांनी जम्मूला, तर दुसरा ट्रक उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरला पाठविला. यातून अचलपूर तालुक्यातील कलिंगडाने पश्चिम बंगालसह जम्मू काश्मीर आणि दक्षिणेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. निजामपूर येथील शेतकरी सुरेंद्र काटोलकर यांच्या शेतातील हे काळपट हिरव्याकंच रंगाचे कलिंगड रसाळ व चविला गोड असे उच्च प्रतीचे ठरले आहे.

या गावात होते उत्पादन

अचलपूर तालुक्यातील निजामपूर, बोरगाव दोरी, वासणी, मेघनाथपूर व बोरगाव पेठ या गावांमध्ये जवळपास २०० एकरावर शेतकऱ्यांनी कलिंगडाची लागवड केली आहे. या गावांसह तालुक्यातील अन्य काही गावांतील शेतकऱ्यांनी कलिंगड लागवडीचा यशस्वी प्रयोग केला. यात त्यांना विक्रमी उत्पादनासह मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभही झाला. पण, एप्रिल २०२० आणि एप्रिल-मे २०२१ मधील लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या या कलिंगडाला अपेक्षेप्रमाणे भाव मिळालेला नाही. केवळ उत्पादनखर्चच शेतकऱ्यांच्या हाती लागला असून, त्यातच त्यांना समाधान मानावे लागत आहे.

Web Title: Kalingad of Achalpur went to the kingdom of 'Didin'; It also prevailed in the south including Jammu and Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.