रवींद्र वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पती-पत्नीमध्ये घटस्फोट झाल्यानंतर वीस वर्षानंतर त्यांचा पुनर्विवाह थाटात पार पडला. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मुऱ्हा गावात शनिवारी सायंकाळी पार पडलेला हा विवाह सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुऱ्हा येथील श्यामराव मोरे यांची मुलगी सुगंधा यांचा विवाह २० वर्षांपूर्वी लाखपुरी (ता. मूर्तिजापूर) येथील संतोष जामनिक (४७) यांच्याशी झाला होता. सात वर्षे संसार सुरळीत चालला. यानंतर संतोषला दारूचे व्यसन जडल्याने दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. त्यामुळे सुगंधा पतीला सोडून माहेरी आली. तेथून दोन वर्षांनंतर सुगंधाचे दुसरीकडे लग्न झाले; पण दुसरा पतीदेखील दारूडा होता. नशेत मारहाण करत असल्याने सुगंधा परत माहेरी निघून आली. त्यानंतर आई-वडिलांच्या घरी राहून शेतीची कामे ती करू लागली. सुगंधाला अपत्य नाही, तर दुसरीकडे सुगंधाचा पहिला पती संतोष जामनिक हा वीस वर्षांपासून पत्नीविना होता.
वीस वर्षांनंतर संतोष हा सुगंधाच्या आई-वडिलांच्या भेटीसाठी आला. त्याने सुगंधासोबत पुनर्विवाह करण्याची इच्छा तिच्या आई-वडिलांकडे बोलून दाखविली. आता मद्यपान करणार नाही, असे त्यांना वचन दिले. त्यामुळे सुगंधासह तिच्या आई-वडिलांनी या पुनर्विवाहाला होकार दिला. पुनर्विवाह शनिवारी सायंकाळी मुऱ्हा येथील बुद्धविहारात पार पडला.