बस पुलाखाली कोसळली
By Admin | Updated: January 5, 2016 00:13 IST2016-01-05T00:13:50+5:302016-01-05T00:13:50+5:30
परतवाडा ते चिखलदरा मार्गावरील घटांग नजीक एस.टी. बस पुलाखाली कोसळली या अपघातात चार प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.

बस पुलाखाली कोसळली
चार गंभीर : १५ जखमी, घटांगनजीकची घटना
चिखलदरा : परतवाडा ते चिखलदरा मार्गावरील घटांग नजीक एस.टी. बस पुलाखाली कोसळली या अपघातात चार प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. अन्य १५ प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्यात. सोमवारी दुपारी २ वाजताचे सुमारास एमएच ४०-८१४२ या परतवाडा आगाराचे बसला हा अपघात झाला. जखमी प्रवाशांना चिखलदरा व अचलपूर येथील उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
परतवाडा आगाराची ही बस चिखलदरा मार्गे चुरणीकडे जात असतांना या बसचे एक्सल तुटल्याने बस १५ फूट खोल पुलाखाली जाऊन कोसळली. यात भीमराव वांगे (१८ मोशी), मुनीया हरसुळे (१८ जाभली), मोतीराम दहिकर (२८ सलीता), शिवचरण चंदेले वाहक परतवाडा, रतन भामरे (७० माखला) अशोक मावस्कर (५० शिजगाव) उमेश तोटे (सलिता), अशोक कासस्देकर (सलिता) मुन्नीबाई नारायण येवले (मसोडी), फुला यवेले (सलोना) विशाल येवले आदीचा जखमी मध्ये समावेश आहे. या बसमध्ये २१ प्रवाशी होते. अशोक मनघटे, अशोक कासस्देकर, मुन्नीबाई येवले , मुनिया हरसुले या चार रूग्णाना गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रूग्णालयात येथे हलविण्यात आले आहे. तर अन्य प्रवाशांना परतवाडा येथील खासगी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)
रग्णवाहिका बेपत्ता
अचलपूर उपजिल्हा रूग्णालात गंभिर रूग्णांना अन्य ठिकाणी उपचारासाठी पाठविण्या करिता रूग्णवाहिका नसल्याची गंभिर बाब आजच्या अपघाताने उघडीअ आली आहे.केवलराम काळे यांनी अचलपूरचे तहसिलदार मनोज लोणाकर यांच्याशी संपर्क साधून खाजगी रूग्णवाहिकेची व्यवस्था केली. त्यानंतर चार गंभिर रूग्णांना अमरावतीत पाठविण्यात आले.
माजी आमदार केवलराम काळे मदतीला धावले
मेळघाटचे माजी आमदार केवलराम काळे यांना अपघाताची माहिती होताच ते तात्काळ घटनास्थळावर पोहचले व त्यांनी अपघात ग्रस्तांना मदतीचा हात दिला.