पत्रकारांच्या घरकुलाचा मुद्दा मार्गी लागणार
By Admin | Updated: July 17, 2015 00:19 IST2015-07-17T00:19:20+5:302015-07-17T00:19:20+5:30
शहरातील श्रमिक पत्रकारांना स्वत:चे घरकुल मिळावे, यासाठी शासकीय जागा म्हाडाकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून

पत्रकारांच्या घरकुलाचा मुद्दा मार्गी लागणार
पालकमंत्र्यांचा पुढाकार : जागा हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू
अमरावती : शहरातील श्रमिक पत्रकारांना स्वत:चे घरकुल मिळावे, यासाठी शासकीय जागा म्हाडाकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून लवकरच पत्रकारांच्या घरकुलाचा मुद्दा मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी पुढाकार घेतला आहे, हे विशेष.
प्रेस क्लब आॅफ अमरावती (पीसीए)च्या वतीने हा मुद्दा रेटून धरण्यात आला होता. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने आजही कित्येक पत्रकारांना भाड्याच्या घरात जीवन व्यतीत करावे लागत आहे. यासर्व समस्यांची जाणिव पालकमंत्री प्रवीण पोटे यांना करून दिल्यानंतर प्रवीण पोटे यांनी गत २८ मार्च रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहात प्रशासन व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलविली होती. या बैठकीत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते व उपविभागीय अधिकारी ठाकरे यांना पत्रकारांच्या घरकुलाकरिता शासकीय ई-क्लास जागा शोधण्याचे आदेश दिले होते.
पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार ७ जुलै रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांनी निवडक पत्रकारांसह शहरालगतच्या ४ ते ५ ई-क्लास जमिनीची पाहणी केली. पाहणी करण्यात आलेल्या शासकीय जागांपैकी दोन ठिकाणच्या जागा पसंतीस उतरल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांनी म्हाडाला जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
यासाठी पालकमंत्र्यांचे पीसीएचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, सचिव त्रिदीप वानखडे यांच्यासह अनेक पत्रकारांनी आभार मानले आहेत. (प्रतिनिधी)