‘बफर झोन’मध्ये आरोग्य पथकाशी हुज्जत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST2020-04-07T05:00:00+5:302020-04-07T05:00:57+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान दगावलेल्या हाथीपुरा येथील एका व्यक्तीच्या थ्रोट स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे चित्रा चौक, पठाण चौक, हैदरपुरा, छाया कॉलनी, चांदणी चौक, इतवारा बाजार हा परिसर प्रशासनाद्वारे बफर झोन घोषित करण्यात आला. या ठिकाणी १४ दिवसांपर्यंत आरोग्य पथकाचा वॉच राहणार आहे. त्या अनुषंगाने शहराच्या अन्य प्रभागांतील १३ पथके या ठिकाणी गृहभेटी देत असल्याची माहिती सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांनी दिली.

‘बफर झोन’मध्ये आरोग्य पथकाशी हुज्जत
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील हाथीपुरा भागात व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने या ठिकाणी १७ एप्रिलपर्यंत आरोग्य पथकांचे सर्वेक्षण सुरू राहणार आहे. या दरम्यान काही परिसरात पथकांना माहिती न देता, त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रकार झाला. त्यामुळे पथकातील सदस्यांना सुरक्षा मिळावी व वास्तव माहिती समोर यावी, यासाठी महापालिका आयुक्तांद्वारे सोमवारी पोलीस आयुक्तांना पत्र देण्यात आले.
जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान दगावलेल्या हाथीपुरा येथील एका व्यक्तीच्या थ्रोट स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे चित्रा चौक, पठाण चौक, हैदरपुरा, छाया कॉलनी, चांदणी चौक, इतवारा बाजार हा परिसर प्रशासनाद्वारे बफर झोन घोषित करण्यात आला. या ठिकाणी १४ दिवसांपर्यंत आरोग्य पथकाचा वॉच राहणार आहे. त्या अनुषंगाने शहराच्या अन्य प्रभागांतील १३ पथके या ठिकाणी गृहभेटी देत असल्याची माहिती सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांनी दिली.
कुटुंबातील व्यक्तींना मागील तीन दिवसांत ताप, सर्दी, कोरडा खोकला, श्वसनाचा त्रास झालेला आहे का, वृद्ध, दिव्यांगांना काही त्रास होत आहे का, कुटुंबातील कुणी विदेशातून अथवा पुणे, मुंबई, दिल्ली येथून आली आहे का, कोणी कोविड-१९ रुग्णांच्या संपर्कात आले आहे का, आदी माहिती विवरणत्रात भरली जात आहे. याद्वारे हे पथक संपर्कात राहणार आहे. त्यामुळे पथकाला खरी माहिती देणे महत्त्वाचे असताना असहकार्य करून त्यांनाच धमकावण्याचा प्रकार काही विशिष्ट लोकांनी केल्याची तक्रार पथकाद्वारे महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली. त्यामुळे पथकाच्या सुरक्षिततेसाठी आयुक्त प्रशांत रोडे यांनी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांना सोमवारी पत्र दिल्याची माहिती आहे.
ज्या ठिकाणी गरज आहे, तेथे आरोग्य पथकाला अतिरिक्त सुरक्षा देण्यासंदर्भात पोलीस आयुक्तांना सोमवारी पत्र दिले. सद्यस्थितीत पथकासोबत एक पोलीस कर्मचारी आहे. या परिसरात १७ एप्रिलपर्यंत नागरिकांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
-प्रशांत रोडे, आयुक्त, महापालिका