अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी जेलभरो
By Admin | Updated: August 17, 2014 22:55 IST2014-08-17T22:55:01+5:302014-08-17T22:55:01+5:30
साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा स्थानिक गर्ल्स हायस्कूल चौकात बसविण्याकरिता प्रशासन स्तरावर दिंरगाई होत असल्याचा आरोप अण्णाभाऊ साठे कृती समितीने केला असून

अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी जेलभरो
अमरावती : साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा स्थानिक गर्ल्स हायस्कूल चौकात बसविण्याकरिता प्रशासन स्तरावर दिंरगाई होत असल्याचा आरोप अण्णाभाऊ साठे कृती समितीने केला असून त्याकरिता शनिवारी राजकमल चौकात लहुजी सेनेच्या १०० कार्यकर्त्यांनी जेलभरो आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले .
सन २००६ पासून साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा राजापेठ येथील अडगळीच्या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. हा पुतळा महापालिकेच्या निधीतून बनविला गेला असून हा पुतळा कॅम्प मार्गावरील गर्ल्स हायस्कूल परिसरात बसविण्यात यावा, ही मागणी केली गेली आहे. याकरिता शासनस्तरावरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून सुध्दा पुतळा हस्तांतरित करण्याकरिता जिल्हा प्रशासन दिरंगाई करित असल्याचा आरोप अण्णाभाऊ साठे पुतळा कृती समितीने केला आहे. पुतळ्याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची अनास्था, महापालिकेचे वेळकाढू धोरण व असहकाराची भूमिका लक्षात घेता आचारसंहितेपूर्वी हा पुतळा बसवू नये, असे प्रयत्न शासन व प्रशासनस्तरावर केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासन व प्रशासनाचा हा मनसुबा हाणून पाडण्यासाठी अण्णाभाऊ साठे कृती समितीच्यावतीने लहुजी सेनेतर्फे शनिवारी जेलभरो आंदोलन करण्यात आले. राजकमल चौकात प्रशासनाविरोधात तीव्र नारेबाजी करुन १०० च्या जवळपास कार्यकर्त्यांनी जेलभरो आंदोलनात सहभाग दर्शविला.
यावेळी राजकमल चौकात गोंधळ उडाला. जेलभरो आंदोलनामुळे राजकमल चौकातील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. अण्णाभाऊ साठे पुतळा कृती समितीचे उत्तमराव भैसने, दादासाहेब क्षीरसागर, राजा हातागडे, बबन इंगोले, देवानंद वानखडे, भरत खडसे, विजय गायकवाड, सुधा खंडारे, संजय वानखडे, प्रकाश वाळसे, प्रभाकर वाळसे, गणेश कलाने, गोपाल हिवराळे, विनोद वाघमारे, मनोज गवळी, रावसाहेब इंगोले आदी कार्यकर्त्यांचा सहभाग होता.