सुखसरी बरसल्या, शेतकरी सुखावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 05:00 IST2021-07-09T05:00:00+5:302021-07-09T05:00:40+5:30
वरूड तालुक्यात शेतकऱ्यांनी मृगातच पेरणी करून घेतली. परंतु, गेल्या आठ दिवसापासून पाऊस आला नसल्याने पिके सुकण्याच्या अवस्थेला पोहोचली होती. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. परंतु, गुरुवारी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मृगात अल्पसा पाऊस आला आणि निघून गेला. त्यानंतर तर आलाच नाही. यानंतरचे नक्षत्र कोरडे गेले. कपाशी, तूर, ज्वारी, सोयाबीन आदी पिके पावसाने दडी मारल्याने कोमेजू लागली. शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.

सुखसरी बरसल्या, शेतकरी सुखावला
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तीन आठवड्यांपासून बेपत्ता झालेला वरुणराजा गुरुवारी अनेक तालुक्यात दमदार बरसला. या सुखसरींनी बळीराजा चिंब झाला आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर कोसळलेल्या पावसामुळे पिकांना कोमेजलेल्या पीकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
अचलपूर, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, चिखलदरा, धारणी या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसला, तर मोर्शी, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तालुक्यातदेखील हलका पाऊस झाला.
वरूड तालुक्यात शेतकऱ्यांनी मृगातच पेरणी करून घेतली. परंतु, गेल्या आठ दिवसापासून पाऊस आला नसल्याने पिके सुकण्याच्या अवस्थेला पोहोचली होती. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. परंतु, गुरुवारी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
मृगात अल्पसा पाऊस आला आणि निघून गेला. त्यानंतर तर आलाच नाही. यानंतरचे नक्षत्र कोरडे गेले. कपाशी, तूर, ज्वारी, सोयाबीन आदी पिके पावसाने दडी मारल्याने कोमेजू लागली. शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. आकाशाकडे ‘आ’ वासून शेतकरी पावसाची वाट पाहत होता. काही शेतकरी दुबार पेरणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत होते. मात्र, गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. समाधानकारक पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. उन्हाळ्यासारखा उकाडा निर्माण होऊन त्रस्त नागरिकांनासुद्धा गारवा मिळाला.
मागील तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात पेरणी धोक्यात आली. सुमारे ५० हजार हेक्टरमधील क्षेत्र प्रभावित झाले. त्या अनुषंगाने गुरुवारी जिल्ह्याच्या ६ ते ७ तालुक्यात दमदार पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सोयाबिन बियाणे कुजायला लागले असताना गुरुवारचा पाऊस या पिकासाठी नवसंजीवनी ठरणार आहे. शुक्रवारीदेखील पाऊस कोसळण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.
अचलपूर तालुक्यातसुद्धा रिमझिम
परतवाडा : आठवडाभरापासून बेपत्ता झालेला पाऊस गुरुवारी दुपारी ३ वाजता रिमझिम बरसला. काळेकुट्ट ढग, पांढरेशुभ्र धुके, अचानक सुटलेला गारवा अशा आल्हाददायक वातावरणात विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर बेपत्ता पावसाने हजेरी लावली. ३० जूनला अल्प कोसळलेला पाऊस आठवडाभरापासून बेपत्ता झाला होता. त्यानंतर गुरुवारी हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानुसार तो आला. पेरणी आटोपल्यावर बेपत्ता झालेला पाऊस गुरुवारी दुपारी ४ वाजता रिमझिम कोसळला. जमिनीची धूप बाहेर निघाल्याने उकाडा निर्माण झाला होता. हवामान खात्याने ८ जुलैला तारीख काहीअंशी खरी ठरली. शिरव्याचा पाऊस सायंकाळपर्यंत रिमझिम हजेरी लावत होता. चातकाप्रमाणे ढगांकडे एकटक डोळे लावून बसलेल्या बळीराजाचे हास्यदेखील यामुळे परतले.
धारणी तालुक्यात पाऊस
धारणी : तालुक्यात दुपारी तीन वाजेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. शेतकरी वर्गाने सोडला सुटकेचा नि:श्वास सोडला. गेल्या २० ते २५ दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर गुरुवारी दुपारी तीन वाजता धारणी तालुक्यात मोठ्या थाटात आगमन केले. दुपारी ३ वाजता दक्षिणेकडून आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. वृत्त लिहिपर्यंत पाऊस जोरदारपणे सुरू होता. या पावसामुळे खरीप हंगामातील पेरणी झालेल्या आणि उगवण होऊन पानांचा बहर आलेल्या सध्याची मरणासन्न स्थिती सुधारण्याची शक्यता बळावली आहे. यामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य फुलून आले आहे.