निवडणुकीत महिला उमेदवाराच्या नावात बदल आता शक्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 10:52 IST2025-03-19T10:51:36+5:302025-03-19T10:52:43+5:30
Amravati : नाव विवाहापूर्वीचे की विवाहानंतरचे निवडणूक आयोगाकडून संभ्रम निकाली

It is now possible to change the name of a female candidate in elections.
गजानन मोहोड
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढविणाऱ्या विवाहित महिलांबाबत मतदार यादीत असलेल्या नावानेच उमेदवारी अर्ज करावा लागत असे. आता मात्र महिलांना उमेदवारी अर्जावर विवाहापूर्वीचे की विवाहानंतरचे नाव असावे, याबाबतचा संभ्रम दूर झाला. यासाठी संबंधित महिलेला उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत आवश्यक पुराव्यासह विनंती अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करता येईल.
राज्य निवडणूक आयोगाने ही सुविधा १३ मार्चच्या आदेशाने उपलब्ध केल्याने महिला उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवाराचे नाव संबंधित मतदार यादीत असणे आवश्यक अर्हता आहे. त्यामुळे महिला उमेदवारांना त्यांच्या संबंधित मतदार यादीत असलेल्या नावानेच उमेदवारी अर्ज दाखल करावा लागत होता. आता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या विवाहित महिला उमेदवारांना मतदार यादीत व उमेदवारी अर्जात नमूद नावाखेरीज त्यांना मतपत्रिकेवर इतर नावाचा उल्लेख करण्याची इच्छा असेल तर तो बदल आता करता येणार आहे.
मात्र यासाठी आवश्यक पुरावे विनंती अर्जासोबत जोडावे लागतील. त्यानंतर वैध उमेदवारांच्या अंतिम यादीत व मतपत्रिका तयार करताना या सुधारित नावाचा समावेश करण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी घेतील. यामध्ये यादीतील नावापुढे विवाहानंतरचे / पूर्वीचे नाव कंसात छापण्याची परवानगी देण्यात येणार आहे. यामध्ये ईव्हीएमवर नाव मुद्रित करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेचा व विहीत फॉडचा वापर होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.
अर्जासोबत हे पुरावे आवश्यक
ज्या नावाचा उल्लेख निवडणूक लढविण्यासाठी करावयाचा आहे, त्याच्या पुष्ठ्यर्थ विवाह नोंदणी प्रमाणपत्र, राजपत्रात प्रसिद्ध विवाहानंतरचे नाव आदी सादर करणे अनिवार्य आहे. सदर राजपत्र उपलब्ध नसल्यास मतदाराने मतदान करण्यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये १७ पुराव्यांपैकी महिला उमेदवारास हव्या असलेल्या नावासहित छायाचित्र असलेला कोणताही एक पुरावा जोडणे आवश्यक आहे. यावर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेतील.