स्थायी समितीत गाजला फवारणी यंत्र खरेदीचा मुद्दा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:01 IST2020-05-16T05:00:00+5:302020-05-16T05:01:17+5:30
जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा १५ मे रोजी डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात विविध विषयाला अनुसरून अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, पूजा आमले, विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे, सदस्य महेंद्र गैलवार, सुनील डिके, अभिजित बोके, सुहासिनी ढेपे, सीईओ अमोल येडगे, डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे, कॅफो दत्तात्रय फिसके आदी उपस्थित होते.

स्थायी समितीत गाजला फवारणी यंत्र खरेदीचा मुद्दा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाचा लढा सुरू आहे. अशातच जिल्हाभरातील ग्रामपंचायतींमार्फत खरेदी केलेल्या फवारणी यंत्राच्या किमतीत मोठी तफावत असल्याचा मुद्दा शुक्रवारी जिल्हा परिषदेत व्हिडीओ कॉफरन्सव्दारे पार पडलेल्या स्थायी समितीत गाजला. दरम्यान या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश झेडपी अध्यक्षांनी दिले आहे.
जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा १५ मे रोजी डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात विविध विषयाला अनुसरून अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, पूजा आमले, विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे, सदस्य महेंद्र गैलवार, सुनील डिके, अभिजित बोके, सुहासिनी ढेपे, सीईओ अमोल येडगे, डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे, कॅफो दत्तात्रय फिसके आदी उपस्थित होते. कार्यालयात उपस्थित खातेप्रमुखांनी पदाधिकारी व सदस्यांच्या प्रश्नाची व्हिसीव्दारे उत्तरे दिली. सध्या कारोनाविषयी खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी १४ व्या वित्त आयोगातून १० ते १५ हजारांचे फवारणी यंत्र ३० ते ३५ हजार रुपये दराने खरेदी केल्याचा प्रकार निदर्शनास आला. हा मुद्दा अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सीईओंच्या निदर्शनास आणून दिला. दरम्यान हे सर्व यंत्र खरेदीच्या चौकशीसाठी समिती नेमलेली आहे. या समितीचा चौकशी अहवाल प्राप्त होताच दोषींवर कार्यवाईचा बडगा उगारला जाणार आहे. याशिवाय सभेत रवींद्र मुंदे यांनी सिंचन विहिरींचा प्रस्ताव मंजूर होत नसल्याचा मुद्दा मांडला. यावर अध्यक्षांनी रोहयो विभागाच्या डेप्युटी सीईओ माया वानखडे यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. समुद्धी महामार्गामुळे खराब रस्ते दुरुस्तीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. बांधकाम विभागाने २५ कोटी २५ लाखाच्या निधी मागणीचा प्रस्ताव सादर केल्याचे अध्यक्षांच्या प्रश्नावर कार्यकारी अभियंता गावंडे यांनी सांगितले.
कापूस खरेदीचा ठराव पारित
जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कापूस खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली. यामध्ये एकाच दिवशी केवळ ५० ते ६० वाहनांतील शेतमालाचे मोजमाप करण्यात येत आहे. दर्यापूर तालुक्यात ६ हजारांची नोंदणी झाली आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ४०० वाहनांचे मोजमाप केल्याचा मुद्दा सदस्य सुनील डिके यांनी सभेत मांडला. दरम्यान कापूस खरेदीची नोंदणी व खरेदीची मुदत वाढण्याबाबतचा ठराव पारित करून हा ठराव पालकमंत्री, पणन मंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्षांनी प्रशासनाला दिलेत.