इर्विन 'हाऊसफुल्ल' रुग्णांना बेड मिळेना; अमरावतीमध्ये रुग्णांची गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 13:57 IST2024-07-16T13:57:20+5:302024-07-16T13:57:47+5:30
वातावरण बदलाचा परिणाम : जलजन्य व कीटकजन्य आजाराचे रुग्ण वाढले

Irvine 'Housefull' Patients Can't Get Beds; Inconvenience of patients in Amravati
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मागील काही दिवसांत वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम हा आरोग्यावर पडला असून रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) मधील मेडिसिन वॉर्डमध्ये एका बेडवर दोन रुग्ण असल्याचे पहायला मिळत असून काही रुग्णांवर खाली जमिनीवर गादी टाकून उपचार केल्या जात आहेत.
इर्विनची रोजची ओपीडी ही एक हजार ते बाराशे रुग्णांची आहे. रोजच या ठिकाणी आवश्यक असलेल्या शेकडो रुग्णांना भरती देखील केले जाते; तसेच शासकीय रुग्णालयात मोफत उपचार मिळत असल्याने या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. सध्या पावसाळा सुरू झाल्याने दरवर्षीप्रमाणे कीटकजन्य; तसेच जलजन्य आजारांचे प्रमाण देखील वाढल्याने रुग्णालयातील ओपीडी; तसेच 'आयपीडी'मध्येही वाढ झाली आहे. महिला मेडिसीन वॉर्ड, पुरुष मेडिसीन वॉर्डामध्ये भरती रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. या ठिकाणी एका बेडवर दोन रुग्ण भरती आहेत. पुरुष मेडिसीन वॉर्ड क्र. १३ मध्ये एका बेडवर दोन रुग्णांवर उपचार सरू होते.
लहान मुले आजारी
वॉर्ड क्र. ५ हा लहान मुलांचा वॉर्डसुद्धा रुग्ण बालकांमुळे हाऊसफुल्ल आहे. उघड्यावरील पदार्थ, तसेच दूषित पाण्यामुळे मुले आजारी पडत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
एकच परिचारिका
मेडिसीन वॉर्डामध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. परिचारिकांवरील कामाचा ताण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वॉर्डातील एकच परिचारिका ही भरती असलेल्या सर्वच रुग्णांना आरोग्य सेवा देत आहे.