अमरावती शहरात आयपीएल सट्टा उधळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:14 IST2021-04-27T04:14:20+5:302021-04-27T04:14:20+5:30
अमरावती : शहरातील इतवारा या मुख्य बाजारपेठेच्या परिसरातील आयपीएल क्रिकेट सट्ट्याचा डाव अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी उधळून ...

अमरावती शहरात आयपीएल सट्टा उधळला
अमरावती : शहरातील इतवारा या मुख्य बाजारपेठेच्या परिसरातील आयपीएल क्रिकेट सट्ट्याचा डाव अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी उधळून लावला. रहिवासी इमारतीत सुरू असलेल्या या सट्ट्याच्या ठिकाणाहून सव्वा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. पाच जणांना अटक करण्यात आली, तर तिघे पसार झाले आहेत. पोलीस सूत्रांनुसार, आयुष भागचंद साहू (१९), अनिकेत नरेश गुप्ता (१९, दोन्ही रा. बालाजी मंदिर लाइन, इतवारा), सुमीत मदनलाल साहू (३१, रा. मसानगंज शाळा क्रमांक २ जवळ), पंकज विष्णू जुआर (३२, रा. जयसीयाराम नगर क्रमांक २) आणि रवि प्रेमनारायण साहू (३०, रा. विलासनगर गल्ली क्रमांक २) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. करण गुप्ता, आयुष शर्मा व विनय गौर पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून पाच मोबाईल, एक एलसीडी, एक डीटीएच बॉक्स, गोल्ड ओरिजनल जम्बो एक्सल बूक व बाईकसह १ लाख २१ हजार ४६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी रविवारी सायंकाळी ५ वाजता धाड टाकली. मात्र, उशिरा रात्री भादंविचे कलम ४२०, ४६८, ४७१, १८८, ३४ सह कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमासह कलम २५ (सी) भारतीय टेलिग्राम कायदा सहकलम ३, ४ साथीचे रोग अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविला.
इतवारा बाजारातील बालाजी मंदिर लाईनमध्ये राहणाऱ्या आयुष साहू याच्या इमारतीत हा गेल्या अनेक वर्षांपासून हा क्रिकेट सट्टा चालविल्या जात होता. पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या आदेशाने रविवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. इतवारा परिसर शहरातील मुख्य बाजार असल्यामुळे जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातील अनेक नागरिक येथे खरेदीसाठी येतात. त्यामुळे या ठिकाणी आयपीएल क्रिकेट सट्टा चांगलाच फुलला होता. पहिल्यांदाच हे क्रिकेट सट्टेबाज पोलिसांच्या हाती लागले आहे.
गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राजकिरण येवले, पोलीस हवालदार राजेश राठोड, राजेंद्र काळे, देवेंद्र कोठेकर, गजानन ढेवले, नीलेश जुनघरे, विशाल वाकपांजर, चेतन कराडे, अमोल यांच्या पथकाने आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर धाड टाकली.