‘तपास सुरू आहे !’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 06:00 IST2019-09-20T06:00:00+5:302019-09-20T06:00:52+5:30
पोलीस केवळ बयानांचा खेळ खेळत असल्याची ओरड आता होऊ लागली आहे. डॉ. भट्टड यांच्या पत्नी व कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, ज्या ठिकाणी डॉक्टरांनी कथितरीत्या आत्महत्या केली, त्या खोलीला दोन दारे आहे. मात्र, पोलिसांच्या तपासात तिसरे दारही उघड होऊ शकते, असे काही जणांनी नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर ठामपणे सांगितले.

‘तपास सुरू आहे !’
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : येथील प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिक राजेंद्र भट्टड यांच्या संशयास्पद मृत्यूला पंधरवडा उलटत असताना, त्यांच्या मृत्यूचे गुढ उलगडण्यात स्थानिक पोलिसांना यश आलेले नाही. डझनभर लोकांची बयाने, सीसीटीव्ही फुटेज आणि न्यायवैद्यक तज्ज्ञांचा प्राथमिक निष्कर्ष हाती असताना, डॉ. भट्टड यांच्या मृत्यूची ठोस कारणमीमांसा होऊ शकली नाही. तमाम दर्यापूरकरांच्या नजरा या प्रकरणाकडे खिळल्या असताना पोलिसांकडून येणारे ‘तपास सुरू आहे’ हे पालुपद संशयाला खतपाणी घालणारे ठरले आहे.
दर्यापूर पोलिसांच्या कार्यतत्परतेवर विश्वास ठेवून शिवसेना, मनसे व इतर राजकीय, सामाजिक कार्यकर्ते ‘वेट अॅन्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत की काय, अशी शंकाही खुलेआम घेतली जात आहे. या प्रकरणाबाबत पोलिसांनी प्रचंड गोपनीयतेचा पवित्रा घेतला आहे. या प्रकरणाबाबत कुणालाही विचारले, तर एकच पठडीतील उत्तर दिले जाते, ते म्हणजे - तपास सुरू आहे. मात्र, त्या तपासादरम्यान काही पुरावे हाती लागलेत का, त्यातून डॉ. भट्टड यांचा मृत्यू नेमका गळफास घेतल्याने झाला की कुणी त्यांना गळफास देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला की अन्य काही, या एकाही प्रश्नाचे उत्तर पंधरा दिवसांनंतरही मिळू शकले नाही.
पोलीस केवळ बयानांचा खेळ खेळत असल्याची ओरड आता होऊ लागली आहे. डॉ. भट्टड यांच्या पत्नी व कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, ज्या ठिकाणी डॉक्टरांनी कथितरीत्या आत्महत्या केली, त्या खोलीला दोन दारे आहे. मात्र, पोलिसांच्या तपासात तिसरे दारही उघड होऊ शकते, असे काही जणांनी नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर ठामपणे सांगितले. तथापि, त्या दिशेने पोलिसांना रोख वळविता आलेला नाही.
पोलीस प्रशासन रेस्टहाऊसलगत असलेल्या आयसीयूमध्ये दाखल काही रुग्णांचे बयान घेणार होती. मात्र, त्यालाही अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. एकंदरीतच या प्रकरणाचा गुंता सुटण्याऐवजी अधिक गडद झाला आहे. सत्य काय ते तातडीने पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मेडिकल संचालकाचे बयान के व्हा?
डॉ. राजेंद्र भट्टड यांच्या गोदावरी हॉस्पिटलनजीक असलेल्या सुविधा मेडिकलचे संचालक हरीश अंबादास भैय्या यांनी दर्यापूर पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली होती. डॉ. भट्टड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आपणाला एका परिचारिकेने सांगितले. त्यांनी आत्महत्या का केली, हे आपणास ज्ञात नसले तरी त्यांच्या मृत्यूची योग्य ती चौकशी व्हावी, असे त्या तक्रारीत नमूद होते. भट्टड यांच्याकडील एक परिचारिका त्यांना फोनद्वारे आत्महत्येची माहिती देत असेल अन् हरीश भैया तातडीने गोदावरी हॉस्पिटलमध्ये जात असतील, यावरून डॉ. राजेंद्र भट्टड व त्यांच्या रुग्णालयात काम करणाऱ्या स्टाफशी त्यांचे अत्यंत आत्मीयतेचे संबंध अधोरेखित होतात. त्यांनी सर्वप्रथम याबाबत तक्रारही नोंदविली. ते या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा ठरू शकतात. मात्र, दर्यापूर पोलिसांनी त्यांचे बयान नोंदविलेले नाही.