‘त्या’ घटनेला अवैध धंद्याची किनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 06:01 IST2019-10-03T06:00:00+5:302019-10-03T06:01:07+5:30
सोमवारला ज्या ठिकाणी जुगार चालू होता, जुगाराच्या खेळातील वादातून हत्या झाली, ती जागा खुली, सार्वजनिक, शासकीय आहे. अगदी उघड्यावर या ठिकाणी खुलेआम जुगार चालू होता. घटनेच्या दिवशीच जुगार भरला असे नाही. नेहमीच या परिसरात खुले आम जुगाराचा खेळ खेळला जातो.

‘त्या’ घटनेला अवैध धंद्याची किनार
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : शहरात घडलेल्या तीन खुनांना अवैध धंद्याची किनार आहे. सोमवारी घडलेल्या पहिल्या खुनाच्या घटनेला पूर्ववैमनस्यासह जुगाराच्या खेळातील वाद कारणीभूत ठरला. मारणारे आणि मरणारा दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, त्यांच्यावर यापूर्वीही वेगवेगळ्या कलमांन्वये पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
खरे तर शहरात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. गांजा, जुगार, वरली मटक्यांसह अनेक अवैध धंदे शहरात खुलेआम सुरू आहेत. याचा फटका युवा पिढीसह नागरिकांना बसत आहे. चोऱ्या, दरोड्याचे प्रमाण वाढले आहे. यात नागरिकांची सुरक्षा व शहरातील कायदा व सुव्यवस्था वेठीस धरली जात आहे.
सोमवारला ज्या ठिकाणी जुगार चालू होता, जुगाराच्या खेळातील वादातून हत्या झाली, ती जागा खुली, सार्वजनिक, शासकीय आहे. अगदी उघड्यावर या ठिकाणी खुलेआम जुगार चालू होता. घटनेच्या दिवशीच जुगार भरला असे नाही. नेहमीच या परिसरात खुले आम जुगाराचा खेळ खेळला जातो.
उघड्यावरील या जुगारानेच खरे तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर, अवैध धंद्यांप्रति त्यांनी स्वीकारलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावले आहे. अवैध धंद्यांना त्यांनी दिलेली सूट निर्ढावलेपणा स्पष्ट करणारा ठरला आहे. अवैध धंद्यांची किनार असलेले ही पहिली घटना नाही. काही महिन्यांपूर्वी अचलपूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपायाचा बळीही या अवैध धंद्यातूनच गेला. गुन्हेगारी प्रवृत्ती जोपासत अवैध धंद्यात गुंतलेल्यांनीच त्या पोलीस शिपायाचा बळी घेतला आहे.
अचलपूर एसडीओ संदीपकुमार अपार यांनी आपल्या आदेशात कलम १४४ चा उल्लेख केला आहे. शहरात संचारबंदी लागू आहे. घरातून कुणीही बाहेर येऊ नये, अशा सूचना गस्तीवरील बंदोबस्तातील पोलीस नागरिकांना देत आहेत. यामुळे संचारबंदी की जमावबंदी, यावर संभ्रम निर्माण होत आहे.
आचार संहितेदरम्यान पहिल्यांदा संचारबंदी
मागील २४ वर्षांत परतवाडा शहरात संचारबंदी लागू होण्याची ही तिसरी वेळ आहे. ३१ आॅक्टोबर १९९५ ला माजी नगरसेवक सुहास कानेटकर यांच्या खुनानंतर शहरासह धोतरखेड्यात संचारबंदी लावण्यात आली होती. यानंतर शहरातील गणेशनगर स्थित एका विवाहीत महिलेला तीन युवकांनी घरात घुसून पेट्रोल टाकून ३० नोव्हेंबर, २००३ ला पेटविले होते. यात एक युवकही जळाला होता. जळालेल्या युवकाच्या मृत्यूनंतर १ डिसेंबर २००३ ला शहरात संचारबंदी लावण्यात आली होती. योगायोग असा की, या तिन्ही संचारबंदी सोमवारीच लावल्या गेल्या आहेत. आचारसंहितेदरम्यान लागलेली ही पहिलीच संचारबंदी आहे.