प्रदीप भाकरे, अमरावती: दर्यापूर येथील सराफा दुकान फोडून सुमारे ७७.६९ लाख रुपयांची सोने, चांदी व रोकड लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. चारही आरोपींनी त्या गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी अटक केलेल्या या टोळीने बीड, खामगाव व मध्यप्रदेशातील नेपानगर येथील घरफोडीच्या घटनांची देखील कबुली दिली. आरोपींनी ९ मे रोजी दर्यापूर येथील सराफा दुकान लुटले होते.
अटक आरोपींमध्ये सुरेश अशोक मोरे (३०, रा. लालबाग, जालना), विजय कैलास खरे (३०, रा. कन्हय्या नगर, जालना), भोलू भीमराव निकाळजे (३०, रा. राजीवगांधी नगर, लालबाग, जालना) व क्रिष्णा हरिचंद्र गायकवाड (३१, रा. खरपोडी, जालना) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले पाच लाख रुपये किमतीची चारचाकी, ३८.२४० ग्रॅम सोने, पाच किलो चांदी, दोन मोबाईल असा एकुण १४ लाख ४७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चारही आरोपींना दर्यापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
घटनाक्रमदर्यापुरातील बनोसा येथील रमेश लोणकर यांचे तेथीलच जिनिंग मार्केट येथे विक्रम ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान आहे. ९ मे रोजी सकाळी तेथे चोरीचा प्रकार उघड झाला होता. चोरांनी तेथून ७६० ग्रॅम सोन्याचे दागिने, १२.८०० किलो चांदीचे दागिने व रोख ५.५० लाख रुपये असा एकूण ७७ लाख ६९ हजार रुपयांचा माल चोरून नेला होता. दर्यापूर पोलिसांनी १० मे रोजी गुन्हा दाखल केला होता. प्रभारी पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या टीम एलसीबीने अवघ्या काही दिवसांत यशस्वी उलगडा केला.