घरफोड्यांची आंतरराज्यीय टोळी क्राईम ब्रॅचकडून ‘ट्रॅप’ ;अमरावतीमधील २७ घरफोडीचे गुन्हे उघड
By प्रदीप भाकरे | Updated: October 4, 2025 20:34 IST2025-10-04T20:34:08+5:302025-10-04T20:34:56+5:30
Nagpur : सोने, कार, मोबाईलसह २१.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त, न्यायाधीशांच्या घरातील चोरीचीही उकल

Interstate gang of house burglars 'trapped' by Crime Branch; 27 house burglary cases revealed in Amravati
अमरावती: शहर गुन्हे शाखेने शनिवारी घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद केले. अटक केलेल्या चार आरोपींनी अमरावती शहरातील तब्बल २७ घरफोडींची कबुली दिली. आरोपींकडून सोने, कार, रोख असा एकुण २१ लाख ३६ हजार ६८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्या अटकेमुळे येथील महिला न्यायाधिशांच्या घरी झालेल्या चोरीचादेखील उलगडा झाला आहे.
अमोल पाटील (३२), सागर देवरे (३०, दोघेही रा. मोहाडी, ता. जामनेर, जि. जळगाव), निखिल उर्फ पिस्तुल पाटील (२४, रा. मांडळ, ता. अमळनेर, जि. जळगाव) व मिलिंद खैरनार (२९, नोळवा, ता. पळसाना, सुरत) अशी अटक आरोपींचे नावे आहेत. येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी महिलेचे घर फोडून सोन्या-चांदीचे दागिणे व नगदी असा ९ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना सर्व आरोपी निष्पन्न केले. चारही आरोपींना ४ ऑक्टोबर रोजी अमरावतीत आणण्यात आले. पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या नेतृत्वात ही कारवाई फत्ते करण्यात आली.
जळगाव, सुरतहून घेतले ताब्यात
चारही आरापी हे आंतरराज्यीय टोळीतील सदस्य आहेत. त्यांना जळगाव तसेच सुरत येथून ताब्यात घेण्यात आले. तत्पुर्वी गुन्हे शाखेचे पथक दहा दिवस जळगाव व सुरत भागात त्यांच्या मागावर होते. ते राहण्याचे ठिकाण वेळोवेळी बदलत असल्याने त्यांना पकडणे आव्हानात्मक होते. मात्र गुन्हे शाखा प्रमुख संदीप चव्हान यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरिक्षकद्वय महेश इंगोले व मनीष वाकोडे यांच्यासह त्यांच्या पथकाने सतत पाळत ठेवून त्यांना ताब्यात घेतले.
असा आहे जप्त मुद्देमाल
आरोपींकडून १२० ग्रॅम सोने, ५०० ग्रॅम चांदी, चार मोबाईल, कार, सहा लाख रुपये रोख, डोंगल, वायफाय राउटर, मिर्ची स्प्रे तथा चारचाकी वाहनाच्या १४ बनावट नंबर प्लेट जप्त केल्या. चारही आरोपींविरूद्ध जळगाव, छत्रपती संभाजी नगर, पुणे, अकोलासह भावनगर गुजरात येथे घरफोडीचे ७२ गुन्हे दाखल आहेत. त्यांचे दोन साथीदार फरार आहेत. आरोपींनी चोरी केलेले सोने हे वेळोवेळी जळगाव येथील सोनार मनकेंद्र सुबल मैती व जामनेर येथील सोनार रोहीत जाधव यांना विक्री केले होते.