विकासकामांचा निधी मार्चपूर्वी खर्च करण्याचे निर्देश
By Admin | Updated: February 11, 2015 00:28 IST2015-02-11T00:28:32+5:302015-02-11T00:28:32+5:30
जिल्हा परिषदेला शासन व जिल्हा निधीतून विकासकामांसाठी उपलब्ध करुन दिलेला निधी येत्या मार्चपूर्वी विकासकामांवर खर्ची घालण्यात यावा, ...

विकासकामांचा निधी मार्चपूर्वी खर्च करण्याचे निर्देश
अमरावती : जिल्हा परिषदेला शासन व जिल्हा निधीतून विकासकामांसाठी उपलब्ध करुन दिलेला निधी येत्या मार्चपूर्वी विकासकामांवर खर्ची घालण्यात यावा, असे निर्देश मंगळवारी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विषय समितीच्या सभेत सभापती गिरीश कराळे यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत.
जिल्हा परिषद बांधकाम विषय समितीची सभा मंगळवारी सभापती कराळे यांच्या दालनात झाली. यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभाग, उपविभागात सुरू असलेल्या रस्ते, नाली बांधकाम, समाज भवन, खडीकरण, डांबरीकरण, तीर्थक्षेत्र, पूल अशा विविध कामांसाठी शासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी हा निधी विकासकामांवर खर्च होणे अपेक्षित आहे. पूर्वीचा अनुभव लक्षात घेता निधी शासनाकडे परत गेल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे अशी कामे त्वरित पारदर्शकपणे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे सुद्धा सुचविण्यात आले आहे. सभेत बांधकाम समितीच्या सदस्यांनी आपल्या जिल्हा परिषद सर्कलमधील विविध विकासकामांबाबतही प्रश्न मांडून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी विकासाचा निधी खर्च करण्यासाठी आणि चांगल्या प्रतीची कामे व्हावी, यासाठी बांधकाम विभागाने खबरदारी घेतली आहे. त्यामुळे विकासाच्या कामात कुठलीही आडकाठी न ठेवता ही कामे मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली. सभेला सभापती गिरीश कराळे, सदस्य ममता भांबुरकर, विनोद डांगे, श्रीपाल पाल, विक्रम ठाकरे, प्रविण घुईखेडकर, मोहन सिंगवी, निशांत जाधव, कार्यकारी अभियंता पी.जी. भागवत, उपअभियंता अरविंद काळमेघ व्यवहारे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)