जिल्हाधिकाऱ्यांचे मुख्याधिकाऱ्यांना निर्देश
By Admin | Updated: September 13, 2015 00:08 IST2015-09-13T00:08:03+5:302015-09-13T00:08:03+5:30
नगरपरिषद मागील वर्षापासून विविध समस्यांनी त्रस्त झाली आहे. निवडणूक काळामध्ये शहरवासीयांना दिलेली मोठमोठी आश्वासने पूर्ण झाली नाहीत.

जिल्हाधिकाऱ्यांचे मुख्याधिकाऱ्यांना निर्देश
अंजनगाव सुर्जी : नगरपरिषद मागील वर्षापासून विविध समस्यांनी त्रस्त झाली आहे. निवडणूक काळामध्ये शहरवासीयांना दिलेली मोठमोठी आश्वासने पूर्ण झाली नाहीत. येथील स्मशानभूमीचीदेखील दुरवस्था झाल्याने परिसरातील नागरिकांचा अंतिम प्रवासही त्रासदायक होत आहे.
खोडगाव मार्गावरील हिंदू स्मशानभूमितील पेव्हींग ब्लॉक व काँंक्रीट रस्त्याचे ८ लाख ३७ हजार रुपयांचे काम केले. परंतु या स्मशानघाटामध्ये पूर्णपणे फुटलेले पेव्हींग ब्लॉक लावण्यात आले.इतर कामही अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले होते. याबाबतची तक्रार प्रभागाच्या नगरसेविका सुनीता मुरकुटे यांनी मुख्याधिकारी, आमदार रमेश बुंदिले, जिल्हाधिकारी क्वॉलिटी कंट्रोल विभागाकडे केली. त्यानंतर आमदार रमेश बुंदिले यांनी स्वत: स्मशानभूूमीतील पेव्हींग ब्लॉक घोटाळ्याची चौकशी व पाहणी केली असता या निकृष्टदर्जाच्या कामाबाबत संबंधित विभागाकडे अहवाल सुध्दा कळविला. तसेच शहरातील आरोग्य विभागाच्या वाढत्या समस्येची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन शहराला अचानक भेट देण्याचे ठरविले. या भेटीदरम्यान खरा प्रकार उघडकीस आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना तातडीने निर्देश देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आता होणाऱ्या घडामोडींकडे लक्ष लागले.