मोदी रूग्णालयाची महापौरांकडून पाहणी
By Admin | Updated: July 16, 2015 00:38 IST2015-07-16T00:38:16+5:302015-07-16T00:38:16+5:30
महापालिकेच्या स्थानिक मोदी रूग्णालयात प्रसूतीसाठी गेलेल्या महिलेला डॉक्टरच उपस्थित नसल्याने उपचार मिळाले नाहीत.

मोदी रूग्णालयाची महापौरांकडून पाहणी
गैरव्यवस्थेचा आढावा : प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची होतेय आबाळ
श्यामकांत सहस्त्रभोजने बडनेरा
महापालिकेच्या स्थानिक मोदी रूग्णालयात प्रसूतीसाठी गेलेल्या महिलेला डॉक्टरच उपस्थित नसल्याने उपचार मिळाले नाहीत. परिणामी अमरावतीला नेताना तिची आॅटोरिक्षातच प्रसूती झाली. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच महापालिकेत एकच खळबळ उडाली. याच पार्श्वभूमिवर महापौर रिना नंदा यांनी या रूग्णालयाला भेट देऊन घटनेबद्दल चौकशी केली. नव्यावस्तीतील मोमीनपुऱ्यात राहणारी शबाना नामक महिला प्रसुतीसाठी १३ जुलै रोजी सकाळी ९ वाजता मोदी दवाखान्यात गेली. परंतु याठिकाणी डॉक्टर, परिचारिकांपैकी कोणीच उपस्थित नव्हते. त्यामुळे महिलेला आॅटोरिक्षाने डफरीन रूग्णालयात हलविण्यात आले. परंतु या महिलेने मार्गातच आॅटोरिक्षामध्ये बाळाला जन्म दिला. रूग्णालयात दोन रूग्णवाहिका असूनही त्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे मोदी दवाखान्याला महापौर रिना नंदा, स्थायी समितीचे माजी सभापती मिलिंद बांबल, अजय गोंडाणे, वैद्यकीय अधिकारी श्यामसुंदर सोनी यांनी रूग्णालयाला भेट दिली.
महिलांच्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया बंद
चार वर्षांपूर्वी मोदी दवाखान्यात नियमित कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. मात्र, आता ही शस्त्रक्रिया महापालिकेने बंद केली आहे. तेव्हापासून बडनेऱ्यासह परिसरातील ग्रामीण भागातील गोरगरिब महिलांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी महिलांना अमरावतीला जावे लागते.
अधिकाऱ्यांचा उफराटा निर्णय
पाहणी दरम्यान वैद्यकीय अधिकारी श्यामसुंदर सोनी यांनी रूग्णालयात केवळ सामान्य प्रसूतीच केल्या जातील. ज्या महिलेची पहिली प्रसूती सामान्य पध्दतीने झाली असेल तिलाच दुसऱ्यांदा या रूग्णालयात प्रसूतीसाठी प्रवेश दिला जाईल, असे महापौरांना सांगितले.