राज्यातील प्रवाशांची मध्यप्रदेशाच्या सीमेवर तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 14:50 IST2021-02-27T14:50:15+5:302021-02-27T14:50:36+5:30
Amravati News मध्य प्रदेशच्या सीमेवर तपासणी करण्याचे निर्देश बैतुलच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. २४ फेब्रुवारीला त्यांनी हे आदेश काढले आहेत.

राज्यातील प्रवाशांची मध्यप्रदेशाच्या सीमेवर तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाराष्ट्रातील कोरोना संक्रमितांची वाढती संख्या बघता, राज्यातील प्रवाशांची, यात्रेकरूंची कोरोनाच्या अनुषंगाने मध्य प्रदेशच्या सीमेवर तपासणी करण्याचे निर्देश बैतुलच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. २४ फेब्रुवारीला त्यांनी हे आदेश काढले आहेत.
परतवाडा-बैतुल मार्गावर बहिरमघाटच्या पुढे मध्यप्रदेश सीमेवरील खोमई बॅरियरवर ही तपासणी केली जात आहे. बहिरमपासून अवघ्या सात किलोमीटरवर ही खोमई बॅरियर आहे. या ठिकाणी परतवाड्याकडून येणाऱ्या प्रत्येक वाहनाला थांबविले जात आहे. वाहनचालक, परिचरांसह प्रवाशांची माहिती या बॅरियरवर घेतला जात आहे. त्याकरिता तेथे एक पथकही तैनात करण्यात आले आहे. मेडिकल प्रमाणपत्र, थर्मल स्क्रीनिंग, मास्क, फेस कव्हर आणि सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात अनिवार्य केला आहे. कोविडची लक्षणे असलेल्या प्रवाशांची रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट करण्यासह सात दिवस क्वारंटाईन ठेवण्याची तयारीही बैतुल जिल्हाधिकाऱ्यांनी चालविली आहे.
दरम्यान, बहिरम येथील आंतरराज्य आरटीओ चेक पोस्टवरही मध्यप्रदेशमधून येणाऱ्यांची माहिती अधूनमधून घेतली जात आहे. अमरावती आणि अचलपूर येथील कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये मध्य प्रदेश शासन व प्रशासन सतर्क झाले आहे. या खोमई चेकपोस्टसह प्रभातपट्टन-वरूड रोडवील गौनापूर बॅरियर आणि मुलताई नागपूर रोडवरील खंबारा टोल नाक्यावर ही तपासणी चालविली आहे.