इंगोले, सिसोदे यांची सभापतिपदी बिनविरोध
By Admin | Updated: March 3, 2015 00:18 IST2015-03-03T00:18:28+5:302015-03-03T00:18:28+5:30
महापालिकेत सोमवारी पार पडलेल्या स्थायी, परिवहन समिती सभापतीपदी काँग्रेसचे विलास इंगोले,

इंगोले, सिसोदे यांची सभापतिपदी बिनविरोध
अमरावती : महापालिकेत सोमवारी पार पडलेल्या स्थायी, परिवहन समिती सभापतीपदी काँग्रेसचे विलास इंगोले, दिव्या सिसोदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी अन्य कोणत्याही सदस्यांचा अर्ज सादर नसल्याने इंगोले, सिसोदे यांच्या निवडीची घोषणा केली.
महापालिकेच्या स्व. सुदामकाका देशमुख सभागृहात सोमवारी सकाळी ११ वाजता स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात आली. काँग्रेसचे विलास ंइंगोले यांचाच एकमात्र सभापती पदासाठी अर्ज सादर असल्याने छाननीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड केली. यावेळी स्थायी समितीच्या १६ पैकी १३ सदस्य हजर होते. तीन सदस्य निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले नाही. यात भाजपचे तुषार भारतीय, कांचन उपाध्याय, जनविकास- रिपाइं आघाडीच्या कुसूम शाहू यांचा समावेश आहे. स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया आटोपल्यानंतर दुपारी एक वाजताच्या दरम्यान परिवहन समिती सभापती पदाची निवडणूक घेण्यात आली. परिवहन समिती सभापती पदासाठीसुद्धा एकमात्र काँग्रेसच्या दिव्या सिसोदे यांचाच अर्ज सादर असल्याने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सिसोदे या बिनविरोध निवडून आल्याची घोषणा केली. घोषणेनंतर जिल्हाधिकारी गित्ते यांनी नववियुक्त सभापती विलास इंगाले, दिव्या सिसोदे यांचे पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. परिवहन समिती सभापती पदाचा निवडणूकीत १२ पैकी चार सदस्य गैरहजर होते. यात काँग्रेसचे अ. रफिक अ. रज्जाक, कांचन ग्रेसपुंजे, भाजपच्या छाया अंबाडकर, जनविकास- रिपाइं आघाडीचे बाळू भुयार यांचा समावेश आहे. दोन्ही सभापतीपद हे काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने या गोटात जल्लोषाचे वातावरण होते. ढोल ताशांच्या गजर, फटाक्यांची आतषबाजी, गुलाल आणि पिवळा, हिरव्या रंगाची उधळण करुन काँग्रेसने विजयाचा आंनदोत्सव साजरा केला.
कांचन ग्रेसपुंजे
यांचा राजीनामा
परिवहन समिती सभापती पदाच्या दावेदारीतून ऐनवेळी कांचन ग्रेसपुंजे यांना डावलल्या गेल्याने त्यांनी व्यथीत होवून काँग्रेस सदस्यपदाचा राजीनामा थेट काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना पाठविला आहे. ग्रेसपुंजे यांच्या आरोपानुसार विद्यमान काँग्रेसचे नेतृत्त्व दिशाहिन झाले असून बडनेरा शहरात मागील १५ वर्षांपासून निवडून येत असताना ज्येष्ठ सदस्यांना डावलण्याचे काम सुरु झाले आहे. राजीनाम्याचे पत्र प्रदेश काँग्रेसचे सचिव संजय खोडके, शहराध्यक्ष संजय अकर्ते, पक्षनेता बबलू शेखावत आदींना पाठविले आहे.