कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव
By Admin | Updated: October 26, 2015 00:42 IST2015-10-26T00:42:24+5:302015-10-26T00:42:24+5:30
जमिनीत आर्द्रतेचा अभाव, अन्नद्रव्याची कमतरता, वातावरणातील बदल व रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव यामुळे जिल्ह्यातील काही भागांत कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव झाला आहे.

कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव
अमरावती : जमिनीत आर्द्रतेचा अभाव, अन्नद्रव्याची कमतरता, वातावरणातील बदल व रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव यामुळे जिल्ह्यातील काही भागांत कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव झाला आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने वेळीच व्यवस्थापन न केल्यास उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीननंतर सर्वाधिक १ लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीचे पीक आहेत. मध्यम स्वरुपाच्या जमिनीतील कपाशीची पाने लाल होण्यास सुरुवात झाली आहे. साधारणपणे बीटीची लागवड सुरू झाल्यापासून लाल्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. सुरुवातीला पक्व झालेले पाने लाल झालेले दिसून येते. नंतर संपूर्ण पाने लाल होतात व पूर्ण कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते. यामुळे उत्पादनात १० ते ६० टक्क्यांपर्यंत घट आल्याची उदाहरणे आहेत. लक्षणे ओळखून उपाययोजना करणे गरजेचे आहे.
बी.टी. कपाशी वाण भरपूर उत्पन्न देणारे असल्यामुळे झाडाला सर्वाधिक पात्या, फुले व बोंडे लागतात. त्यांच्या पोषणासाठी जर जमिनीत मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये कमी असल्यास किंवा नत्र स्फुरद व पालाश ही खते समप्रमाणात व शिफारसीत दिलेली नसल्यास पाने लाल होतात. कपाशीमध्ये कायिक वाढीच्या काळात नत्राची कमतरता झाल्यास नत्राच्या कमी वहनामुळे प्रथिनांचे प्रमाण घटून पेशी द्रव्यांचा सामू कमी होऊन ‘टॅनीनची’ मात्रा वाढल्यामुळे पाने लाल होतात. जमीन सतत ओली असल्यास पोटॅशसुध्दा कमी प्रमाणात स्थिर होतो. लाल्यामुळे कॅलशियम, मॅग्नेशियम व पोटॅश या अन्नद्रव्यांच्या शोषण क्षमतेवरही विपरीत परिणाम झाल्याचे व सुदृढ झाडाच्या पानांच्या तुलनेत लाल पानांमध्ये नत्र, स्फुरद व पालाश कमी झाल्याचे आढळून आले आहेत. (प्रतिनिधी)