पदाधिकारी निवडणूक, ऑनलाईन बदल्यांमध्ये गेले सरते वर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:14 IST2020-12-31T04:14:11+5:302020-12-31T04:14:11+5:30
सन २०२० या वर्षाच्या सुरूवातीलाच जानेवारी महिन्यात जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या अडीच वर्षानंतर निवडणुकीने सुरूवात झाली होती. यात अध्यक्ष व ...

पदाधिकारी निवडणूक, ऑनलाईन बदल्यांमध्ये गेले सरते वर्ष
सन २०२० या वर्षाच्या सुरूवातीलाच जानेवारी महिन्यात जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या अडीच वर्षानंतर निवडणुकीने सुरूवात झाली होती. यात अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राज्यात सत्तेत असलेली सध्याची महाविकास आघाडीची मुहूर्तमेढही येथील जिल्हा परिषदेत रोवल्या गेली. या पहिल्याच प्रयोगात मिनिमंत्रालयात सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेसला शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व अन्य लहान पक्ष संघटनांना एकत्र येत सत्तेची नवी मोट बांधली. या अचानक घडलेल्या राजकीय खेळीची जिल्हाभर चांगलीच चर्चा रंगली होती. हा कित्ता विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत कायम राहिला. त्यानंतर झेडपीच्या नव्या शिल्लेदारांनी सत्तेची सूत्रे हातात घेताच दोनच महिन्यातच कोरोना विषाणूचे संकट ओढवले. या संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आराेग्यासह सर्वच प्रशासकीय यंत्रणा सज्ज होऊन यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. कोरोनाचे संकट अधिक गडद झाल्याने लॉकडाऊनमुळे प्रशासकीय कामकाजाची घडीही विस्कळीत झाली होती. परिणामी शासनाकडून शासकीय योजना व विकास कामांनाही कात्री लावण्यात आली होती. परिणामी विकास कामांची निधीअभावी वाटही बिकट झाली होती. अशातच जून महिन्यात शिक्षक वगळता झेडपीच्या अन्य कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्या कोरोना काळातच आटोपण्यात आल्यात. हे संकट कमी होत असतांना शिक्षक मतदार संघाची आचारसंहिता अन् आता जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची पुन्हा आचारसंंहितेमुळे विकासासोबतच कामकाजाची गतीही मंदावली आहे. या सारख्या घटनाक्रमाने मिनिमंत्रालयाचे सरते वर्ष चर्चेत राहिले.
बॉक्स
समाजकल्याण मधील निविदेचा घोळ
जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागाकडून वाचनालयांना देण्यात येणाऱ्या पुस्तकांचे निविदेचा घोळ सरत्या वर्षात चांगलाच गाजला. जवळपास २० ते २० लाखाचा घोळ झाल्याचा आरोप झाला या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमावी अशी मागणी करण्यात आली होती. याशिवाय आरोग्य विभागातीलही कुरबुरीने सरते वर्ष चांगलेच गाजले.
बॉक्स
आरोग्य यंत्रणेवर ताण
ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी आरोग्य विभागाकडून टास्क फोर्स गठित करण्यात आले. आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविकांसाठी हा काळ अतिशय आव्हानात्मक राहिला. ग्रामीण भागात घरोघरी जाऊन आरोग्य तपासणीचे अभियान हाती घेण्यात आले. तसेच आतापर्यंत चाललेला ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हा शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्पसुद्धा कर्मचाऱ्यांनी आपल्या जिद्दीने यशस्वी करून दाखविला.
बॉक्स
विविध विभागात कोरोनाचा शिरकाव
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढताच याची बांधा जिल्हा परिषदेच्या विविध विभागात पोहोचली होती. परिणामी कोरोना काळात कर्तव्य बजाविणाऱ्या जिल्हा परिषदेतील विविध विभागातील जवळपास २०० कर्मचारीही कोरोनाबाधित आढळून आले होते. परिणामी यावर आता मात्र करून यातील कर्मचारी कामावर परतले आहेत.