‘त्या’ आंतरराज्यीय सोनेरी टोळीविरूध्द मकोकाप्रमाणे कलमवाढ !

By प्रदीप भाकरे | Updated: February 19, 2025 14:29 IST2025-02-19T14:28:34+5:302025-02-19T14:29:34+5:30

चेनस्नॅचिंगचे २१ गुन्हे उघड : १०० ग्रॅम सोने जप्त, तीन आरोपी पसार

Increase in penalties like MCOCA against 'that' interstate gold gang! | ‘त्या’ आंतरराज्यीय सोनेरी टोळीविरूध्द मकोकाप्रमाणे कलमवाढ !

Increase in penalties like MCOCA against 'that' interstate gold gang!

अमरावती: शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने भुसावळ येथून अटक केलेल्या इराणी गॅंगच्या टोळीतील चेनस्नॅचर्सविरूध्द आता मकोकाप्रमाणे भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस)कलम ११२ नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तुर्तास एका स्थानिकासह दोन्ही आरोपींना गाडगेनगर पोलिस ठाण्यात नोंद गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १०० ग्रॅम सोन्याची लगड जप्त करण्यात आली आहे. पोलिस जेव्हा या आरोपींना अन्य गुन्हयात अटक करतिल, त्या गुन्हयात ती कलमवाढ करण्यात येईल. बीएनएसचे कलम ११२ हे किरकोळ संघटित गुन्हे किंवा सर्वसाधारणपणे संघटित गुन्हयांसंदर्भातील कलम आहे.
             

चार दिवसांपूर्वी शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस निरिक्षक बाबाराव अवचार यांच्या नेतृत्वातील पथकाने जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथून एका अट्टल मंगळसूत्र चोरट्याला अटक केली. त्याने मंगळसूत्र चोरीचे तब्बल २१ गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यातील १३ गुन्हे हे शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतील आहेत. तसेच पोलिसांनी त्याच्याकडून १०० ग्रॅम सोने जप्त केले आहे. आणखी रिकव्हरीसाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. हसन अली उर्फ आशु नियाज अली (२१, रा. पापानगर, भुसावळ) असे अटक केलेल्या अट्टल मंगळसूत्र चोरट्याचे नाव आहे.

कारागृहात झाली होती ओळख

या टोळीला शहरात आश्रय देणाऱ्या शेख जुबेर शेख निसार (रा. लालखडी) यालासुद्धा पोलिसांनी अटक केली. हसन अली व त्याचे अन्य तीन साथीदार असे चौघे भुसावळवरून दुचाकीने शहरातून मंगळसूत्र चोरी करण्यासाठी येत होते. दरम्यान मंगळसूत्र लूटमार करण्यासाठी आल्यानंतर ते शेख जुबेर याच्या घरी वास्तव्य करत होते. शेख जुबेर व अब्बास या दोघांची वर्षभरापूर्वी अमरावती कारागृहात ओळख झाली होती. त्याच ओळखीतून ही टोळी अमरावतीत गुन्हे करण्यासाठी आल्यानंतर जुबेर आश्रय देत होता.

टोळीतील अन्य तिघांची नावे निष्पन्न
हसन अली याने पोलिस कोठडीदरम्यान आपण चेनस्नॅचिंगचे ते सर्व गुन्हे अब्बास अली, मुस्तफा अली आणि जाफर हुसेन यांच्यासह केल्याची कबुली दिली आहे. ते तिनही लुटारु पसार असून, पोलिस त्यांचाही शोध घेत आहेत. क्राईम टूचे पथक त्यांच्या मागावर आहे. आरोपींनी केवळ अमरावती शहर, नागपूर, अकोला, धुळेच नव्हे तर परराज्यात देखील चेनस्नॅचिंगच्या घटनांना अंजाम दिला आहे.

गाडगेनगर, राजापेठ टार्गेट
पोलिसांनी हसन अलीला अटक केल्यानंतर त्याच्याकडून माहिती घेतली, त्यावेळी त्याने शहरातील गाडगेनगर हद्दीतील सात, राजापेठ हद्दीतील पाच व फ्रेजरपुरा हद्दीतील एक असे एकूण मंगळसूत्र चोरीचे १३ गुन्हे केल्याचे समोर आले आहेत. या १३ गुन्ह्यांव्यतिरिक्त त्याने अकोल्यात तीन, नागपुरात चार व धुळे येथे एक मंगळसूत्र चोरी असे एकूण २१ गुन्हे केल्याची बाब समोर आली. अमरावतीतील १३ गुन्हयांपैकी ११ गुन्हे हे मागील वर्षीचे तर दोन गुन्हे यंदाच्या सुरूवातीचे आहेत.

 

"मंगळसूत्र चोरीतील सोने आरोपींनी भुसावळमधील एका सुवर्णकाराला विकले होते. क्राईम युनिट दोनने या प्रकरणात शंभर ग्रॅम सोने जप्त करून आणले आहे. या टोळीतील अन्य तिघे पसार आहेत. शहर पोलिसांचे पथक त्यांच्या अटकेसाठी रवाना केले आहे."
- नविनचंद्र रेड्डी, पोलिस आयुक्त

Web Title: Increase in penalties like MCOCA against 'that' interstate gold gang!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.