मुख्याध्यापकांच्या संचमान्यतेत गृहराज्यमंत्र्यांचा ‘शिरकाव’
By Admin | Updated: May 25, 2016 00:31 IST2016-05-25T00:31:04+5:302016-05-25T00:31:04+5:30
संचमान्यता समायोजनामुळे मुख्याध्यापकांवर गंडांतर येत असल्याच्या पार्श्वभूमिवर शिक्षण विभागाने मंगळवारी आढावा बैठक बोलाविली होती.

मुख्याध्यापकांच्या संचमान्यतेत गृहराज्यमंत्र्यांचा ‘शिरकाव’
आश्वासनांची खैरात : बैठकीत पोहोचले ‘बिन बुलाए मेहेमान’
अमरावती : संचमान्यता समायोजनामुळे मुख्याध्यापकांवर गंडांतर येत असल्याच्या पार्श्वभूमिवर शिक्षण विभागाने मंगळवारी आढावा बैठक बोलाविली होती. मात्र, निमंत्रण नसताना गृहराज्यमंत्री रणजित पाटील बैठकीत पोहोचले. यावेळी ना. पाटील यांनी मुख्याध्यापकांशी ‘राजकीय’ संवाद साधून आश्वासनांची खैरात वाटली. गृहराज्यमंत्र्यांच्या या अनोख्या शैलीमुळे शिक्षण विभागही हतबल झाला होता, हे विशेष.
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षण विभागाचे शुद्धिकरण करण्याचा चंग बांधला असला तरी त्यांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकांना ‘टार्गेट’ करीत शासन निर्णय निर्गमित केल्याची चर्चा आहे. दररोज नवनवीन शासन निर्णयाने शिक्षकवर्ग हतबल झाला आहे. काही महिन्यांपासून संच मान्यता लागू होण्याची भीती मुख्याध्यापकांना होती. मात्र, तुर्तास यातून मुख्याध्यापकांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे संचमान्यता देताना किती मुख्याध्यापक अतिरिक्त आणि रिक्त ठरतात, ही वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांची आढावा बैठक बोलावली होती.
पाटलांचे भाषणही राजकीय
अमरावती : ही बैठक पूर्णपणे प्रशासकीय असताना यात गृहराज्यमंत्र्यांनी शिरकाव केल्याने ही बाब अनेक मुख्याध्यापकांना खटकली. या आढावा बैठकीत ना. रणजित पाटील यांच्यासोबत अमरावती विभागाचे शिक्षक आ.श्रीकांत देशपांडे यांनी देखील हजेरी लावल्याने मुख्याध्यापकांच्या आढावा बैठकीला राजकीय स्वरूप आले होते. शिक्षण विभागाकडून आढावा बैठकीचे ना. रणजित पाटील, आ. श्रीकांत देशपांडे यांना निमंत्रण नसताना ते पोहचले कसे?, हा देखील चर्चेचा विषय ठरला आहे. संचमान्यता समायोजनाच्या बैठकीत ना.ेपाटील यांचे भाषण दिलासा देण्याऐवजी पूर्णत: राजकीय ठरल्याने मुख्याध्यापकांमध्ये प्रचंड संताप पसरला होता. आढावा बैठकीला शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सी.आर.राठोड, उपशिक्षणाधिकारी कांबे, बोलके आदी उपस्थित होते.
शिक्षक संघर्ष समितीकडून प्रश्नांची सरबत्ती
राज्यात शिक्षकांचे प्रश्न, समस्या कायम असताना ते सोडविण्यात ना. रणजित पाटील अथवा आ. श्रीकांत देशपांडे यांना अपयश आल्याचा आरोप करुन त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. शिक्षक संघर्ष समितीचे शरद तिरमारे, प्रवीण गुल्हाने, विकास दुबे आदींनी ना. पाटील यांना निरुत्तर केले. संचमान्यतेसाठी सांस्कृ तिक भवनाची गरज होती काय? हा कार्यक्रम राजकीय कसा? असे प्रश्न शिक्षक संघर्ष समितीने मांडले. विना अनुदानीत शाळांचे प्रश्न सोडविण्याऐवजी राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. वेतनाचा प्रश्न रखडल्याचे यावेळी मांडण्यात आले.
सांस्कृतिक भवनाचे बुकिंग केले कुणी?
संचमान्यतेविषयी मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असला तरी या बैठकीसाठी संत ज्ञानेश्वर संकूल कोणी बुक केले, हा विषय चर्चेचा ठरला आहे. संत ज्ञानेश्वर भवनात बैठक घेण्याची परवानगी शिक्षण विभागाने घेतली काय? आणि भाडे कोण अदा करणार ? असे अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत.
गृहराज्यमंत्र्यांचा पदवीधर निवडणुकीवर डोळा
मुख्याध्यापक पदवीधर मतदार संघाचे मतदार असल्याने ना. रणजित पाटील ही संधी ‘कॅश’ करण्यासाठी थेट बैठकीला उपस्थित झाले. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मुख्याध्यापकांचे सहकार्य मिळेल, अशी त्यांना आशा होती. मात्र, बैठकीनंतर मुख्याध्यापकांच्या प्रतिक्रिया ना. रणजित पाटील यांच्याविरोधात उमटल्यात.