स्टीम सप्ताहाची घरोघर अंमलबजावणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:14 IST2021-04-27T04:14:13+5:302021-04-27T04:14:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : कोरोना साथीचे संक्रमण रोखण्यासाठी कोविड सुसंगत जीवनशैली प्रत्येकाने आत्मसात करणे गरजेचे झाले आहे. यासोबतच ...

स्टीम सप्ताहाची घरोघर अंमलबजावणी करा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना साथीचे संक्रमण रोखण्यासाठी कोविड सुसंगत जीवनशैली प्रत्येकाने आत्मसात करणे गरजेचे झाले आहे. यासोबतच नियमितपणे वाफ घेतल्यास कोरोनाचा विषाणू शरिरातून दूर होऊ शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांच्या तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे स्टीम सप्ताहाची घरोघर अंमलबजावणी व्हावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.
कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येकाने मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे, नेहमी हात स्वच्छ धुणे या कोरोना प्रतिबंधक त्रिसुत्रीचे काटेकोर पालन करतानाच, चांगला सकस आहार, कोविड सुसंगत जीवनशैली, नियमित वाफ घेणे आदींचाही अवलंब प्रत्येकाने केला पाहिजे. त्याबाबत जनजागृतीसाठी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून स्टीम सप्ताह दिनांक २६ एप्रिल ते २ मे दरम्यान राबविण्यात येत आहे. या कालावधीत व त्यानंतरही सर्वांनी वाफ घेऊन स्टीम सप्ताह यशस्वी करावा. प्रत्येक घरातून साथीचा कायमचा समूळ नायनाट करण्याचा प्रयत्न ‘स्टीम सप्ताह’ राबवून करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सर्व तालुका प्रशासनांकडूनही विविध गावांमध्ये सप्ताहानिमित्त उपक्रम राबविण्यात येत आहेत. ऑनलाईन व्यासपीठांचा वापर करूनही सप्ताहाबाबत जनजागृतीचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.