चांदूर बाजार तालुक्यात निर्माल्यविरहित श्रीगणेशाचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:14 IST2021-09-22T04:14:34+5:302021-09-22T04:14:34+5:30
पूर्णामाय स्वच्छता अभियानाचा उपक्रम फोटो - हरकुट २१ पी चांदूर बाजार : तालुक्यातील कुरळपूर्णा येथील पूर्णा नदीकाठावर तीन वर्षांपासून ...

चांदूर बाजार तालुक्यात निर्माल्यविरहित श्रीगणेशाचे विसर्जन
पूर्णामाय स्वच्छता अभियानाचा उपक्रम
फोटो - हरकुट २१ पी
चांदूर बाजार : तालुक्यातील कुरळपूर्णा येथील पूर्णा नदीकाठावर तीन वर्षांपासून पूर्णमाय स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार यंदाही अनंत चतुर्दशीच्या पर्वावर शेकडो घरगुती गणपतीचे निर्माल्यविरहित विसर्जन करण्यात आले.
क्षात्रवीर संभाजी क्रीडा युवक प्रतिष्ठान, राष्ट्रीय हरित सेना, सामाजिक वनीकरण विभाग व माणुसकी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तीन वर्षांपासून पूर्णमाय स्वच्छता अभियान राबविण्यात येते. ते यावर्षीही अनंत चतुर्दशीला कुरळपूर्णा येथे राबविण्यात आले. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत मंडळाचे कार्यकर्ते असो वा घरगुती गणपती यांची मनोभावे पूजन करून हारार्पण करतात. मात्र, विसर्जनाच्या दिवशी तेही नदीत सोडले जाते. नदीपात्रात निर्माल्य पसरल्याने पात्र प्रदूषित होते व नदीचे पाणी आटले की, त्या निर्माल्याची दुर्गंधी सुटून परिसरातील आरोग्याला हानी पोहोचण्याची शक्यता असते. याशिवाय नदीत राहणाऱ्या जिवांना धोका निर्माण होतो. याची दखल घेऊन काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत हे अभियान हाती घेतले.
अभियानाला चांदूरबाजार तालुक्यातील सर्वच गणेशभक्तांनी भरभरून सहकार्य केले. यावर्षी एकाच दिवसात तीन ट्रॅक्टर-ट्राॅली निर्माल्य गोळा करण्यात आले. हे निर्माल्य सामाजिक वनीकरण विभागाला देणार आहे. त्यांच्याकडून आवश्यक प्रक्रिया करून खत तयार करण्यात येईल, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे तुषार देशमुख यांनी दिली. समन्वयक प्रतीक देशमुख, सदाशिव देवताळे यांच्या प्रयत्नातून व सामाजिक वनीकरणच्या सहकार्याने दरवर्षी हे अभियान राबविले जाते.
गतवर्षी या नदीपात्रात दोन युवकांचा बळी गेला होता. यामुळे यावर्षी खोलवर पाणी असलेल्या ठिकाणी विसर्जनाला प्रतिबंध घालण्यात आला होता. गतवर्षीचा पात्रातील रस्ता बंद करून डाव्या बाजूचा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला. सार्वजनिक मंडळ वगळता खाजगी वाहनांना नदीपात्राजवळ जाण्यास मज्जाव करण्यात आला. ठाणेदार सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांसह वाहतूक पोलिसांना बंदोबस्त यासाठी तैनात करण्यात आला होता. नदीपात्रानजीक खाजगी गोताखोर लक्ष ठेवून होते. सायंकाळपर्यंत कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती ठाणेदार सुनील किणगे यांनी दिली.
या उपक्रमाला सामाजिक वनीकरणचे वनपाल कथे, रवींद्र धाकडे, प्रवीण शंकरपाळे, राहुल मनोहरे, सागर जेपुलकर, दुर्योधन मनोहरे, धनंजय वाघमारे, निलेश पळसपगार त्याचप्रमाणे महसूलचे प्रतीक चव्हाण, तळकित यांचेही सहकार्य लाभले.