नेरपिंगळाई येथील ऐतिहासिक श्रीगणेशाचे जल्लोषात विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:14 IST2021-09-22T04:14:43+5:302021-09-22T04:14:43+5:30

लोटांगण प्रथा कायम, मुस्लिम बांधवांकडून स्वागत नेरपिंगळाई : येथील पौराणिक व पारंपरिक गुरू गंगाधर स्वामी मठाच्या गणपतीचे सोमवारी विसर्जन ...

Immersion of the historical Shriganesha at Nerpingalai in Jallosha | नेरपिंगळाई येथील ऐतिहासिक श्रीगणेशाचे जल्लोषात विसर्जन

नेरपिंगळाई येथील ऐतिहासिक श्रीगणेशाचे जल्लोषात विसर्जन

लोटांगण प्रथा कायम, मुस्लिम बांधवांकडून स्वागत

नेरपिंगळाई : येथील पौराणिक व पारंपरिक गुरू गंगाधर स्वामी मठाच्या गणपतीचे सोमवारी विसर्जन झाले. दरवर्षी ढोल-ताशांच्या गजरात, वाजतगाजत गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. पण, यंदा कोरोनामुळे अत्यंत साधेपणाने गणरायाला निरोप दिला.

रविवारी रात्री १२ वाजता सुरू झालेला विसर्जन सोहळा सोमवारी दुपारी १ वाजेपर्यंत मंगलमय शांततेच्या वातावरणात पूर्ण झाला. या वर्षी कोरोनामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे विसर्जन करण्यात आले. दरवर्षी ढोल-ताशे व तृतीयपंथीयांच्या नृत्यासाठी प्रसिद्ध असणारा हा सोहळा मिरवणुकीशिवाय पार पडला. धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक व सर्वधर्म समभावाची भूमिका असणाऱ्या मठाच्या गणपतीचे मुस्लिम बांधवांकडून पूजा करून स्वागत करण्यात आले. मानाच्या गणपतीसोबतच गुलाबपुरी महाराज संस्थान व मालगे यांच्या गणपतीचीसुद्धा या सोहळ्यात सहभाग होता. मानाच्या मठाच्या गणपती विसर्जनानंतर गावातील सर्व मंडळांचे व घरगुती गणपती विसर्जित करण्यात आले.

सोहळ्यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये, मोठ्या मिरवणुका निघू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरखेडचे ठाणेदार विक्रांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल ठाकरे, पोलीस पाटील राजेश राऊत, बीट अंमलदार श्याम चुंगडा, किरण लाकडे, नीलेश देशमुख, मनोज टप्पे, रामेश्वर इंगोले यांच्यासह संपूर्ण पोलीस यंत्रणा सज्ज होती. मिरवणुकीत शांतता टिकून राहावी, यासाठी शांतता कमिटीचे सदस्य, सरपंच सविता खोडस्कर, पंचायत समितीच्या उपसभापती सोनाली नवले यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आदींनी परिश्रम घेतले.

----------------

तरुणांनी घेतली जबाबदारी

विसर्जन मार्गाची गावातील ‘माझे गाव माझी जबाबदारी’ या तरुणाच्या संघटनेने संपूर्ण साफसफाई केली तसेच गावातील गणेश मंडळांनी मूर्तीसोबतचे निर्माल्य गोळा करून नदी व पर्यावरण वाचविण्याचा संदेश दिला.

मुस्लिम बांधवांकडून फुलांचा वर्षाव

गावात विविध ठिकाणी फराळाची सोय करण्यात आली होती तसेच येथील मुस्लिम बांधवांच्यावतीने गणरायावर फुलांचा वर्षाव करीत गणरायाला निरोप देण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

Web Title: Immersion of the historical Shriganesha at Nerpingalai in Jallosha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.