प्रतिकुलतेवर मात करीत रोशन बनला उपनिरीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 21:27 IST2019-03-10T21:27:34+5:302019-03-10T21:27:50+5:30
घरची आर्थिक परिस्थिती बेताची. आईवडील शेतमजूर. बालपणी न जाणतेपणी झालेली शिक्षणाची परवड. या परिस्थितीसमोर गुडघे न टेकता त्याने अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले. स्पर्धा परीक्षेसाठी कुठलीही शिकवणी न लावता सातव्या प्रयत्नात तो पोलीस उपनिरीक्षक बनला.

प्रतिकुलतेवर मात करीत रोशन बनला उपनिरीक्षक
सूरज दाहाट।
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : घरची आर्थिक परिस्थिती बेताची. आईवडील शेतमजूर. बालपणी न जाणतेपणी झालेली शिक्षणाची परवड. या परिस्थितीसमोर गुडघे न टेकता त्याने अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले. स्पर्धा परीक्षेसाठी कुठलीही शिकवणी न लावता सातव्या प्रयत्नात तो पोलीस उपनिरीक्षक बनला. ही यशोगाथा आहे, नजीकच्या पालवाडी गावातील रोशन सुधाकर राऊत या ध्येयवेड्या तरुणाची. दोन वर्षांपूर्वी त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. त्याचा निकाल शुक्रवारी घोषित झाला. अन रोशनच्या आनंदाला भरती आली. विशेष म्हणजे रोशनचे आई-वडील निरक्षर आहेत. मात्र त्या निरक्षतेवर मात करून त्यांनी रोशनला जगण्याचे ध्येय दिले.
घरी अवघी दोन एकर कोरडवाहू शेत. कुटुंबाच्या उदरनिवार्हाची संपूर्ण जबाबदारी त्या शेतावर न् शेतमजुरीवर. परिस्थिती प्रतिकूल असली तरी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या बळावर जीवनात यश मिळवायचेच, असा निर्धार रोशनने केला होता. त्याने सतत दोन वर्षे तिवसा येथील श्री राजश्री शाहू महाराज वाचनालयात रोज १२ तास लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. २०१७ मध्ये रोशनने राज्यसेवा आयोगाची परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. त्यानंतर त्याच्या घरी आनंदोत्सव साजरा झाला. अवघ्या ७०० लोकसंख्येच्या पालवाडी गावातील एक तरुण पीएसआय झाल्याने गावातील तरुणांमध्ये काही करून दाखविण्याची जिद्द निर्माण झाली आहे.
असा होता दिनक्रम
रोज सकाळी ११ वाजता गावातून तीन किमी पायी भांबोरा फाट्यावर यायचा. तेथून तिवसास्थित वाचनालयात आल्यानंतर रात्री ९ वाजेपर्यंत तेथे अभ्यास करायचा. पालवाडी गाव हे ७०० लोकवस्तीचे असून या गावात सन २०१७ पर्यंत एसटी पोहोचलेली नव्हती. तो दररोज ६ किमी पायी प्रवास करायचा. या खडतर प्रवासातून त्याने हे यश संपादन केल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळत आहे.
हलाखीच्या परिस्थितीतून मी पोलीस उपनिरीक्षक झालो. माझ्या कार्यकर्तृत्वातून सामान्यांना न्याय मिळावा, यासाठी प्रयत्नरत राहील. गावातील अन्य तरुण अधिकारी व्हावेत, यासाठी प्रयत्न करेन.
- रोशन राऊत,
पीएसआय उत्तीर्ण विद्यार्थी