मांस विक्री कायद्याकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: July 23, 2016 00:46 IST2016-07-23T00:46:37+5:302016-07-23T00:46:37+5:30
प्राण्यांची कत्तल आणि मांस विक्रीबाबत अनेक कायदे असले तरी याची कुठेही अंमलबजावणी होताना दिसत नाही.

मांस विक्री कायद्याकडे दुर्लक्ष
उघड्यावर मांस विक्री : नागरिकांच्या आरोग्यास धोका
वरुड : प्राण्यांची कत्तल आणि मांस विक्रीबाबत अनेक कायदे असले तरी याची कुठेही अंमलबजावणी होताना दिसत नाही. याचा बालमनावर विपरीत परिणाम होतो. उघड्यावरची मांसविक्री व रोगट प्राण्यांच्या मांसामुळे खवय्यांना दुर्धर आजारांची लागण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
बदलत्या काळात ७० टक्के नागरिक मांसाहार करतात. यामुळे गावागावात मांस विक्रीचे दुकाने उघडयावर थाटले आहेत. तर खवय्याकरता मांस हे अन्न आहे. त्यामुळे मानवी आरोग्याच्या सुरक्षेबाबत अन्न व औषधी प्रशासन विभागाला याबाबीशी काहीही घेणे देणे नाही. वरुड तालुक्यातील अनेक गावात उघडयावर खुलेआम प्राण्यांची कत्तल केल्या जाते. या गावातील बाजार केवळ मांसासाठी प्रसिध्द असतो. अनेक प्राणी व पक्ष्यांचे मांस या बाजारात विक्रीस उपलब्ध असते. पंचक्रोशीतून केवळ मांस घेण्याकरिता या ठिकाणी खवय्यांची रीघ लागते. कत्तलीनंतर तीन बांबूवर टांगून त्याचे विच्छेदन केले जाते. शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थी, महिलांना हा किळसवाणा प्रकार पाहून त्यांच्या मनावर याचा विपरीत परिणाम होत आहे. शाकाहारी मणुष्यासांठीसुध्दा हा प्रकार किळसवाणा आहे. प्राण्यांचे विच्छेदन केल्यानंतर अनावश्यक अवयव अस्ताव्यस्त वाटेल तेथे फेकण्यात येते. फेकलेल्या अवयवावर कुत्रे, वराह यथेच्छ ताव मारून पुन्हा विच्छेदन करतात. तसेच उघड्यावर विक्रीस असलेल्या मांसावर घाणीतील माशा घोंघावतात. रोगट प्राण्यांच्या मासांमुळे मानवी आरोग्याला धोका असून प्रशासन मात्र सुस्त आहे. प्राणी व पक्ष्यांची कत्तल व मांस विक्रीबाबत संबंधित विभागाकडून माहिती घेतली असता अनेक बाबी उघड झाल्या. कोणत्याही प्राण्यांची कत्तल करण्याबाबत कायदयाचे बंधन आहे. मांस विक्री करण्यासाठी नगरपरिषद, ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेल्या दुकानातूनच मांस विक्री करणे बंधनकारक असताना शहरासह खेडयापाडयात या कायद्याची अंमलबजावणी होताना कुठेही दिसत नाही. कत्तल करण्यापुर्वी प्राण्यांची वैद्यकीय तपासणी करणे आणि नंतरच प्राण्याची कत्तल करणे गरजेचे असते. जर सदर प्राणी रोगट असला तर त्याचे मांस खाण्यायोग्य राहत नाही. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या उपयोगिता प्रमाणपत्रानंतरच प्राण्याची कत्तल केल्या गेली पाहिजे, असे निर्देश आहे. परंतु हे सर्व नियम असताना कायद्याची एैशीतैशी करून कायद्याला केराची टोपली दाखविण्यात येत आहे. यामुळे उघड्यावर मांस विक्री होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सर्रास तालुक्यात सुरू आहे. (प्रतिनिधी)