समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल; तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 13:09 IST2025-08-04T13:07:45+5:302025-08-04T13:09:41+5:30

Amravati : वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना होणार ऑनलाईन दंड, दरमहा ११ लाख वाहने धावतात

If you go high speed by samruddhi mahamarg, you will be caught; a thousand 'eyes' will be watching you | समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल; तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’

If you go high speed by samruddhi mahamarg, you will be caught; a thousand 'eyes' will be watching you

अमरावती : राज्याच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या समृद्धी महामार्गावर दरमहा ११ लाख लहान-मोठी वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. मात्र, या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता नागपूर ते मुंबई या दरम्यान ७०१ किमी अंतरापर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत.

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढलेली असून, कार किमान १२० तर ट्रकसाठी ८० च्या वेगाने धावण्याची मुभा दिली आहे. तथापि, या महामार्गावर वाहनांचे अपघात वाढल्याने ‘समृद्धी’वर बोट ठेवले असले, तरी आता नागपूर ते मुंबईपर्यंत ७०१ किमीचा प्रवास अवघ्या ८ तासांत पूर्ण होत आहे. त्यामुळे या महामार्गावर कर्नाटक, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील वाहने मोठ्या प्रमाणात धावताना दिसत आहेत. कुठेही गतिरोधक आणि वळण नसलेल्या समृद्धी महामार्गावर हळूहळू सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, यवतमाळ, अकोला, संभाजीनगर, अहिल्यानगर, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे. या महामार्गावर वाहनांची गर्दीदेखील वाढल्याचे वास्तव आहे.

तिसरा डोळा ठेवणार नजर
समृद्धी महामार्गावर लहान-मोठ्या वाहनांची वेगमर्यादा किती? यावर आता सीसीटीव्हीची नजर असणार आहे. प्रत्येक किमी अंतरावर एक कॅमेरा बसवला जाणार आहे. किमान एक हजार कॅमेरे या महामार्गावर लागणार असून, त्याकरिता एमएसआरडीसीने दोन नामांकित कंपनीसोबत करार केला आहे. अत्यंत अत्याधुनिक असे हे कॅमेरे असतील.

तर होणार ऑनलाईन दंड
नागपूर ते मुंबई दरम्यान महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बारीकसारीक लक्ष ठेवणार आहेत. एक कॅमेरा ५०० मीटर परिघातील सर्व काही बघणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे तपासणीची व्यवस्था प्रत्येक जिल्ह्यात कंट्रोल रूम तयार करून बघितली जाणार आहे. ‘समृद्धी’वर याठिकाणी वाहने थांबवू नयेत, असा आदेश झुगारणारे चालक, वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याचा ‘वॉच’ असणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास अशा चालकांना ऑनलाईन दंड निश्चित केला जाणार आहे. त्यामुळे यापुढे आता वाहनचालकांना मनमर्जी करता येणार नाही. तसेच अपघात झाल्यास त्वरेने मदत मिळणे शक्य होणार आहे.

दरमहा ११ लाख वाहने धावतात
समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई येथून नागपूरच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहने धावत आहेत. कमी काळात या महामार्गावरून वाहनांची वर्दळ वाढली असून, लहान-मोठी अशी दरमहा ११ लाख वाहने धावत असल्याचा अंदाज आहे. इतर महामार्गांच्या तुलनेत अवजड वाहनांसाठी जादा टोल असताना सुद्धा कमी वेळेत गंतव्य ठिकाणी पोहोचता येत असल्यामुळे समृद्धी महामार्गावर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याची माहिती नागपूर येथील एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता गजानन पळसकर यांनी दिली.

Web Title: If you go high speed by samruddhi mahamarg, you will be caught; a thousand 'eyes' will be watching you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.