बस बिघडल्यास त्याच तिकिटात करा आता एसी बसने प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 14:44 IST2025-04-04T14:43:32+5:302025-04-04T14:44:10+5:30
Nagpur : आता एसटी प्रवाशांना येणार नाही अडचण. सर्व आगारांना दिले आदेश

If the bus breaks down, now travel by AC bus with the same ticket
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसचे ब्रेकडाऊन वाढले आहे. देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष, निम्म दर्जाच्या साहीत्याचा वापर यामुळे हा प्रकार वाढला आहे. अपघातांची संख्याही अधिक आहे. याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतो.
मार्गावर फेल झालेल्या, अपघात झालेल्या साध्या बसचे प्रवासी घेण्यास उच्चश्रेणी बसचे चालक-वाहक टाळाटाळ करतात. आता हे चालणार नाही. असे महामंडळाने ठणकावले आहे. फेल झालेल्या साध्या बसच्या प्रवाशांना उच्चश्रेणी बसमध्ये घ्यावे लागेल. असे अलीकडेच एसटी महामंडळाने काढलेल्या परिपत्रकातून सूचित केले आहे, मार्गावर असलेल्या निमआराम, शयनयान, शिवशाही, शिवाई, शिवनेरी या उच्चश्रेणी बसच्या चालक-वाहकांनी फेल पडलेल्या साध्या बसेसच्या प्रवाशांना घ्यावे असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहेत. शिवाय साध्या बसच्या तिकीट दरातच ही सुविधा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता महामंडळाने सर्व विभागांना आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे सांगीतले आहे.
महामंडळाच्या बसचे प्रकार
अनेक प्रकारच्या बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात आहेत. त्यात अश्वमेघ, शिवनेरी, शिवशाही, इलेक्ट्रिक यासारख्या एसटी बसेसचा यामध्ये समावेश आहे.
एसटीचा पूर्वीचा नियम ?
पूर्वी ज्या श्रेणीची बस आहे, त्याच श्रेणीच्या बसमधून प्रवाशांना प्रवास करावा लागत होता.
नियमात सुधारणा काय ?
आता या नियमात सुधारणा करण्यात आली आहे. कनिष्ठ श्रेणीच्या बसमधील प्रवाशांना यापुढे कोणत्याही वरिष्ठ श्रेणीच्या बसमधून प्रवास करता येईल.
साधे तिकीट एसी बसमध्येही चालणार
नव्या नियमानुसार आता साधी बस मार्गात फेल झाल्यास त्याचे तिकीट एसी बसमध्ये चालणार आहे.
या बसचे तिकीट जास्त महाग
एसटी महामंडळात आजघडीला अनेक श्रेणीच्या बस प्रवाशांच्या सेवेत कार्यरत आहेत, त्यात निमआराम, शयनयान, शिवशाही, शिवाई, शिवनेरी या बसचे तिकीट अधिक महाग आहेत.
निर्मनुष्य ठिकाणी व्हायचा जीविताला धोका
पूर्वी एखाद्या ठिकाणी बस फेल झाल्यास त्याच श्रेणीच्या बसमध्ये प्रवास करता येत होता. अनेकदा निर्मनुष्य ठिकाणी बस फेल झाल्यास धोका होतो
उच्चश्रेणी बसची व्यवस्था
मार्गात साधी बस काही कारणांमुळे बदलावी लागत असेल, उच्चश्रेणी बसची व्यवस्थाही करून द्यावी लागणार आहे.
"परिवहन महामंडयाने काढलेल्या परिपत्रकानुसार नियमानुसार अंमलबजावणी केली जाणार आहे."
- योगेश ठाकरे विभागीय वाहतुक अधिकारी