रेशन कार्ड धारकांकडे हे पुरावे नसल्यास कार्ड करण्यात येईल निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 11:51 IST2025-04-07T11:49:45+5:302025-04-07T11:51:34+5:30
३१ मेपर्यंत प्रक्रिया : उत्पन्न, रहिवासी पुरावा नसल्यास आता कार्ड निलंबित

If ration card holders do not have this evidence, the card will be suspended.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अपात्र लाभार्थी सरकारी स्वस्त धान्याचा लाभ घेत असल्याने पुरवठा विभागाद्वारा अशा रेशन कार्डधारकांचा ३१ मेपर्यंत शोध घेण्यात येणार आहे. ई-केवायसीमुळे या प्रकाराला आता बराचसा आळा बसला आहे. या मोहिमेत आता रेशन कार्डधारकांच्या वार्षिक उत्पन्नासह रहिवासी पुराव्याची पडताळणी होणार आहे. हा पुरावा नसल्यास रेशन कार्ड रद्द होणार आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये रेशन कार्ड तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे व यामध्ये आता रेशन दुकानदार यांच्यामार्फत एक अर्ज देण्यात येणार आहे. यामध्ये अर्जासोबत शिधापत्रिकाधारकाला ते त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा लागणार आहे. यामध्ये भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबाबत पुरावा, गॅस जोडणी क्रमांकाची पावती, बँक पासबुक, विजेची देयक, टेलिफोन देयक, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड आदी प्रती देता येणार आहेत व हे सर्व फॉर्म रेशनदुकानद्वारा पुरवठा विभागाकडे जमा करण्यात येणार आहेत.
... तर नोटीसपश्चात रेशन कार्ड निलंबित
शिधापत्रिकाधारकांना वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस पुरवठा विभाग बजावणार आहे. निलंबित रेशन कार्डधारकास पुन्हा १५ दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे व या अवधित कागदपत्रे सादर न झाल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहे.
"शासन निर्देसानुसार जिल्ह्यात प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ई-केवायसीमुळे अपात्र लाभार्थ्यांना चाप बसला आहे."
- प्रज्वल पाथरे, सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी