वासनेऐवजी मुले प्रेमातून जन्मली असती तर जग प्रेममय असते !
By Admin | Updated: January 18, 2017 00:13 IST2017-01-18T00:13:13+5:302017-01-18T00:13:13+5:30
'तुमची मुले वासनेतून जन्माला आली आहेत. ती प्रेमातून जन्माला आली असती तर समाजात अराजकता नसती,' ...

वासनेऐवजी मुले प्रेमातून जन्मली असती तर जग प्रेममय असते !
हेरंब कुलकर्णी : वर्तमान शिक्षणपद्धतीवर वैचारिक प्रहार
अमरावती : 'तुमची मुले वासनेतून जन्माला आली आहेत. ती प्रेमातून जन्माला आली असती तर समाजात अराजकता नसती,' असे मतप्रदर्शन हेरंब कुलकर्णी यांनी 'जे कृष्णमूर्ती आणि स्कूल्स आॅफ कृष्णमूर्ती' या विषयावर आयोजित व्याख्यानादरम्यान केले. श्वाश्वत कन्सेप्ट स्कूलच्यावतीने येथील मातोश्री विमलाबाई सभागृहात ते बोलत होते.
विख्यात तत्त्वज्ञ जे.कृष्णमूर्ती यांच्या शिक्षणाविषयीच्या विचारांचे नाना पदर त्यांनी या व्याख्यानातून उलगडले. तुरुंग आणि शाळा ही जगातील दोनच ठिकाणे अशी आहेत की जेथे मुलांना दाखल करावे लागते, अशा भेदक शब्दांमधून शिक्षणाविषयीचे वास्तव व्यक्त करणारे जे.कृष्णमूर्ती हे शिक्षणाप्रती किती संवेदनशील होते, याचा अनुभव श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या व्याख्यानातून कुलकर्णी यांनी केला.
कृष्णमूर्ती यांच्या शिक्षणविषयक विचारांना मूर्त स्वरुपात उतरविणाऱ्या पाच शाळा भारत देशात सुरू आहेत. त्या शाळांमध्ये कृष्णमूर्ती यांच्या विचारांची तरलता जाणवत असली तरी कृष्णमूर्तींची प्रतिमासुद्धा दिसत नाही. 'व्हाट टू थिंक' ऐवजी 'हाऊ टू थिंक' ही मूलभूत प्रक्रिया मुलांमध्ये त्यांच्या शिक्षणादरम्यान विकसित करणे हे कौशल्य शाळांमधून साधता यायला हवे. संवेदनशीलता मुलांच्या अंगी फुलविणे हा उद्देश शिक्षणाचा असावा. मुलांवर कुण्याही यशस्वी व्यक्तींचा आदर्श कळत नकळतपणे थोपविला तर जात नाही ना, याबाबत पालक आणि शिक्षकांनी अत्यंत सजग असायला हवे. तो आदर्श तसा थोपविला गेल्यास त्या चिमुकल्यांत असलेल्या तमाम अंगभूत गुणवत्ता आणि संवेदना निरर्थक असल्याचा त्यांचा समज होईल. सादर करण्यात आलेल्या आदर्श व्यक्तीप्रमाणे घडलो तरच आम्ही गुणवंत आणि यशस्वी ठरू, असा गैरसमज मुलांच्याठायी निर्माण होईल. नैसर्गिकरीत्या बहरू पाहणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व त्यामुळे कुंठीत होईल. परमोच्च बिंदूपर्यंत होऊ पाहणारा एका मानवी व्यक्तिमत्त्वाचा विकास शिक्षणाच्याच चुकीच्या पद्धतीमुळे खुंटला जाईल, असा उलगडा कुलकर्णी यांनी केला.
सार्वजनिक बांधकाम खात्याचे तत्कालीन सचिव धनंजय धवड, तत्कालीन शिक्षणाधिकारी पंडित पंडागळे, शाश्वत कोअर ग्रुपच्या महिला सदस्य मुक्ता तुषार वरणगावकर, सोनाली इंगळे, सीमा मामर्डे, गीता जाधव, वैशाली आकोडे यावेळी मंचावर उपस्थित होत्या. धनंजय धवड आणि पंडित पंडागळे यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. अंबानगरीतील प्रसिद्ध मूर्तिकार अतुल जिराफे यांनी साकारलेले सुंदर आणि बोलके गांधीशिल्प कुलकर्णी यांना भेट देण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजक अतुल आणि अमृता गायगोले यांनी आगळ्या आणि संवेदनशील विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानाला उपस्थित भरगच्च श्रेत्यांनी मनापासून दाद दिली. शाश्वत कन्सेप्ट स्कुलमध्ये अवलंबिली जाणारी शिक्षणपद्धती कृष्णमूर्ती स्कूल्सच्या पद्धतीशी मैत्री करणारी असल्याचे निरीक्षण हेरंब कुलकर्णी यांनी नोंदविले.