एडमीन हैदराबादचा तर, पोस्ट पाठविणारा उत्तर प्रदेशचा
By Admin | Updated: October 25, 2015 00:20 IST2015-10-25T00:20:54+5:302015-10-25T00:20:54+5:30
'व्हॉट्सअॅप'वर धार्मिक भावना दुखावणारे छायाचित्र पोस्ट केल्याने शुक्रवारी सायंकाळनंतर चपराशीपुऱ्यात तणाव निर्माण झाला होता.

एडमीन हैदराबादचा तर, पोस्ट पाठविणारा उत्तर प्रदेशचा
अमरावती : 'व्हॉट्सअॅप'वर धार्मिक भावना दुखावणारे छायाचित्र पोस्ट केल्याने शुक्रवारी सायंकाळनंतर चपराशीपुऱ्यात तणाव निर्माण झाला होता. फे्रजरपुरा पोलिसांनी छायाचित्र पाठविणाऱ्या मोबाईल क्रमांकाधारकाविरुध्द गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केल्यावर 'व्हॉट्स अॅप' समूहाचा एडमीन हैदराबादचा तर पोस्ट पाठविणारा उत्तर प्रदेशातील इटावा येथील रहिवासी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. आता सायबर गुन्ह्याविषयीची चौकशी पूर्ण झाल्यावर पोलीस आरोपीला अटक करण्याकरिता रवाना होणार आहे.
पोलीस सूत्रानुसार, पठाण चौकाजवळील गुलजार नगरातील रहिवासी जाकीर हुसेन गुलाम हुसेन यांच्या 'व्हॉटसअॅप' क्रमांकावर शुक्रवारी सायंकाळी धार्मिक भावना दुखावणाऱ्या छायाचित्रांचा संदेश आला.
याबाबत विशेष समुदायातील नागरिकांना कळताच हजारो नागरिकांनी पोलीस आयुक्तालयाकडे धाव घेऊन आरोपीविरुध्द तत्काळ कारवाईची मागणी पोलिसांकडे केली. एकाच वेळी हजारो नागरिक रस्त्यावर उतरल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. नागरिकांनी परिसरातील व्यावसायिकांना आपापली प्रतिष्ठाने बंद करण्याच्या सूचनादेखील दिल्या होत्या. पोलिसांनी प्रसंगावधान राखून तणाव शांत करण्याचा प्रयत्न केला. तसेच विशेष समुदायीतील धर्मगुरूंनीही नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केल्यानंतर तणाव निवळला. याप्रकरणी फे्रजरपुरा पोलिसांनी मोबाईल क्रमांक ८३०७२२२१७४ च्या धारकाविरुध्द भादंविच्या कलम २९५(अ) अन्वये गुन्हा दाखल करून तपासकार्य सुरूकेले आहे. या चौकशीत 'व्हॉट्सअॅप'चा एडमीन हैदराबादचा व पोस्ट पाठविणारा उत्तर प्रदेशातील इटावा येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तसेच 'व्हॉट्स अॅप'वरील अन्य मोबाईल क्रमांक आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेशातील असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. याप्रकरणी पोलीस सखोल चौकशी करीत असून गुन्हा निष्पन्न झाल्यास आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना तेथे होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)