बुलेटला मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावाल तर परवान्याला मुकावे लागेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 10:51 IST2024-12-12T10:50:33+5:302024-12-12T10:51:10+5:30

वाहतूक शाखा ऑन रोड : सायंकाळनंतरही रस्तोरस्ती मोहीम

If a bullet is fitted with a loud silencer, the license will be forfeited | बुलेटला मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावाल तर परवान्याला मुकावे लागेल

If a bullet is fitted with a loud silencer, the license will be forfeited

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
बुलेटचा मूळ सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावण्याचे फॅड सध्या तरुणाईमध्ये आहे, तसेच काही टवाळखोर बुलेटस्वारांकडून फटाक्यासारखा मोठा आवाजही केला जातो. यामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्णांना याचा त्रास तर होतोच; परंतु फटाक्याच्या या आवाजामुळे इतर वाहनचालकही बिचकतात. अशा बुलेटस्वारांवर पोलिसांकडून कारवाई व्हावी, अशी नागरिकांची मागणी होती. या मागणीची दखल घेत पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी व पोलिस उपायुक्त कल्पना बारवकर यांनी वाहतूक पोलिसांना सायलेन्सर बदलणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाई आदेश दिले आहेत.


वाहतूक पोलिसांनी सायलेन्सर बदलणाऱ्या १०० हून अधिक बुलेटराजांवर दंडात्मक कारवाई केली आहे. अशांकडून दंड वसूल केला जातो. तर मॉडिफाइड सायलेन्सर जप्त करून दुसरे सायलेन्सर लावून घेतल्याशिवाय वाहन दिले जात नाही. शहर वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षक ज्योती विल्लेकर व रीता उईके यांच्या नेतृत्वातील पूर्व व पश्चिम अशा दोन्ही शाखांकडून गेल्या आठ दिवसांपासून शहरात सर्वत्र वाहतूक नियमनासाठी स्पेशल ड्राईव्ह घेतला जात आहे. तरीदेखील पंचवटीच्या उड्डाणपुलावरून थेट इर्विन राजापेठच्या उड्डाणपुलावर वायुवेगाने जाणाऱ्या मोजक्या दोन ते तीन बुलेटस्वारांवर वचक बसलेला नाही. वाहतूक पोलिसांनी त्यांचा शोध चालविला आहे. 


अशी झाली कारवाई 
म्युझिकल हॉर्न, मॉडिफाइड सायलेन्सर, बिगर नंबर, फॅसी नंबर वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाते. नोव्हेंबरअखेरपर्यंत अशा विविध शीर्षाखाली सुमारे ३ हजारांपेक्षा अधिक वाहनचालकांना ई-चलानने दंड आकारण्यात आला. शहर वाहतूक विभागाच्या पूर्व व पश्चिम अशा दोन शाखांमधील अधिकारी अंमलदारांकडून ती कारवाई केली जाते.


या रस्त्यावर बुलेटस्वारांचा सर्वाधिक त्रास 
शिवाजी कॉलेज रोड, चपराशीपुरा ते बसस्टँड रोड, नवा बायपास मार्गावर अनेक बुलेटस्वार कर्णकर्कश आवाज करताना आढळून येतात. दोन ते तीन लाख रुपयांच्या त्या बुलेट आहेत.


पोलिस दिसले की आवाज कमी 
पंचवटीपासून दररोज एक बुलेटस्वार कर्णकर्कश आवाज करत इर्विनकडे जातो. मात्र, पंचवटी व इर्विन चौकात वाहतूक पोलिस असल्याने त्याच्या बुलेटचा आवाज कमी होतो. अलीकडे पोलिस आयुक्तालय ते एसटी डेपो रोडनेदेखील एक बुलेटस्वार धाडधाड आवाज करत वायुवेगाने जात असल्याचे चित्र आहे.


"सातत्यपूर्ण कारवाई मॉडिफाइड सायलेन्सर लावून वाहन बेदरकारपणे चालविणाऱ्या बुलेटस्वारांविरुद्ध वेळोवेळी दंडात्मक कारवाई केली जात आहे. मॉडिफाइड सायलेन्सर काढून घेत जोपर्यंत मूळ सायलेन्सर लावले जात नाही, तोपर्यंत वाहन दिले जात नाही. मागील आठवड्यात त्यासाठी स्पेशल ड्राईव्ह घेण्यात आला." 
- ज्योती विल्लेकर, वाहतूक निरीक्षक

Web Title: If a bullet is fitted with a loud silencer, the license will be forfeited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.