डीएनएतून ओळखा फळझाडांची आनुवंशिकता
By Admin | Updated: August 16, 2014 23:12 IST2014-08-16T23:12:06+5:302014-08-16T23:12:06+5:30
मानवाची आनुवंशिकता ओळखण्यासाठी डिएनए तपासणी सर्वापरी माध्यम आहे. आता फळांची आनुवंशिकता माहिती करण्यासाठी घरघुती चाचणीद्वारे फळांचे डिएनए शोधण्याची पध्दत विकसित करण्यात आली आहे.

डीएनएतून ओळखा फळझाडांची आनुवंशिकता
वैभव बाबरेकर - अमरावती
मानवाची आनुवंशिकता ओळखण्यासाठी डिएनए तपासणी सर्वापरी माध्यम आहे. आता फळांची आनुवंशिकता माहिती करण्यासाठी घरघुती चाचणीद्वारे फळांचे डिएनए शोधण्याची पध्दत विकसित करण्यात आली आहे. श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे संशोधक प्रशांत महल्ले यांनी केलेल्या संशोधनामुळे शेतकऱ्यांना फळाच्या डिएनएचा शोध घेता येणार आहे. फळझाडांची लगवड करुन उत्पन्न वाढीसाठी शेतकरी प्रयत्नरत असतात. मात्र रोपटे चांगल्याप्रकारचे फळ देईलच, असे नाही. अनेक शेतकरी संत्रा, डाळींब, लिंबू, मौसंबी, चिकू अश्या विविध फळ झाडांची लागवड करतात.
शेतकऱ्यांची फसवणूक टळणार
या वृक्षाची ५ ते ६ वर्षांमध्ये वाढ होते. त्यांनतर त्या वृक्षाला फळे येतात. मात्र या झाडांना लागलेली फळे गोड व चविष्ट असेलच असे नाही. फळांचे उत्पन्न झाल्यावर ती फळे पाहिजे तेवढी चविष्ट नसतात. तसेच अनेकदा फळाचा रंग व आकारामधे शेतकऱ्यांचे समाधान होत नाही. अशावेळी आपली फसवणुक झाल्याचे शेतकऱ्यांना माहिती होते. नाईलाजाने शेतकऱ्यांना त्याच फळाच्या झाडातून उत्पन्न काढावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना फळांची इत्तंभूत माहिती असणे गरजेचे आहे. मात्र आता शेतकऱ्यांना घाबरण्याचे कारण नाही. शेतकऱ्यांना फळाची इत्तंभूत माहिती होण्यासाठी फळाच्या डिएनए चाचणीची सोपी पध्दत तयार झाली आहे. कोणताही शेतकरी फळांची निश्चित माहिती गोेळा करुन आपल्या फळांचा दर्जा सुधारु शकतो. शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्रशांत महल्ले यांनी फळाबाबत इत्तंभूत माहितीवर काम केले असून फळाच्या डिएनएचा शोध घेऊन त्यांची अनुवंशिकता शोधून काढली आहे. घरगुुती प्रक्रियेच्या माध्यमातून कोणत्याही फळाचा डिएनए शोधला जाऊ शकतो याचा शोध त्यांनी लावला असून शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येऊ शकतो. यामुळे शेतकऱ्यांची फसगत टळणार आहे.
पाच फळांची डीएनए चाचणी
संशोधक महल्ले यांच्या मार्गदर्शनात चैत्राली विधळे, पुर्वी गुप्ता यांनी आंबा, सफरचंद, केळी, संत्रा व चिकू या फळांच्या डिएनएचा शोध घेतला आहे. यात त्यांना यश मिळाले आहे. शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एन.जे. चिखले यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मृद व कृषी रसायन शास्त्र विभागाचे प्रमुख पी. डी. देशमुख, एस. एन. गावंडे, डी.जी. पाडेकर, लांजेवार, पतंगराय व सावरकर यांचे सहकार्य लाभले.